scorecardresearch

नागपूर : आंबेडकर भवन प्रकरणी गजभियेंकडून जनतेची दिशाभूल, नरेंद्र जिचकार यांची टीका

अंबाझरी तलावाशेजारील डॉ. आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.

Narendra Jichkar criticism of public misleading by Gajbhiye in Ambedkar Bhavan case (1)
आंबेडकर भवन प्रकरणी गजभियेंकडून जनतेची दिशाभूल, नरेंद्र जिचकार यांची टीका (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावलौकिकास साजेसे भवन उभारण्यात येणार आहे. मात्र, निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये आंबडेकरी जनतेची दिशाभूल करीत आहेत. एका चांगल्या प्रकल्पाला विरोध करीत आहेत, अशी टीका गरुडा अम्युझमेंट पार्क प्रा.लि.चे संचालक नरेंद्र जिचकार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

अंबाझरी तलावाशेजारील डॉ. आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. अंबाझरी तलावाशेजारी आंदोलक मांडव टाकून बसले आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र जिचकार पहिल्यांदाच समोर आले. त्यांनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला आणि हा प्रकल्प डॉ. आंबेडकर यांच्या नावलौकिकास साजेसा राहील, असा दावा केला. ते म्हणाले, अंबाझरी तलावाशेजारी डॉ. आंबेडकर स्मारकासाठी जागा दिल्याची कुठेही नोंद नाही. येथे आधी भवन उभारण्यात आले आणि त्यानंतर डॉ. आंबेडकर यांचे नाव दिले गेले असावे. पण गजभिये समाजातील काही लोकांना चुकीची माहिती देऊन त्या प्रकरणाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहे.

हेही वाचा >>> मोठी पर्यावरण हानी झालेल्या ५० विभागांत महाराष्ट्र; ; भारतातील नऊ राज्यांचा समावेश

शासकीय नोकरीत ते मोठ्या पदावर राहिले. समाज त्यांना हुशार मानतो. पण ज्याप्रकारे ते लोकांना खोटी माहिती देऊन भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत ते योग्य नाही. कोणालाही गरुडा कंपनी करीत असलेल्या प्रकल्पाविषयी काही गैरसमज असल्यास त्यांच्या समोर सादरीकरण करून तो दूर करण्याची आपली तयारी आहे. यावेळी त्यांनी ४२.५ एकरमध्ये प्रस्तावित प्रकल्पाविषयी पॉवर पाईंट प्रेझेंटेशन द्वारे माहिती दिली आणि काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षांत तो पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> बुलढाणा : ‘कॉपी मुक्त’अभियान फसले, चौघा कॉपीबहाद्दरांना पकडले; सव्वासातशे विद्यार्थ्यांची दांडी

सत्य समोर येईल

डॉ. आंबेडकर भवन आणि आसपासाची ९० ते १०० झाडे वादळामुळे पडल्याचे नरेंद्र जिचकार यांनी सांगितले. ते म्हणाले, नागपुरात ८ जून २०१० रोजी वादळ आले होते. त्यामुळे झाडे मुळासकट कोलमडली आणि इमारतीची पडझड झाली होती. गरुडा कंपनीने झाडे किंवा इमारत पाडली नाही. या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांनी नेमलेली समिती करीत आहे. त्यातून सत्य बाहेर येईल, असेही जिचकार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 09:20 IST

संबंधित बातम्या