महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या सहकार्याने नाकाद्वारे दिली जाणारी नेझल लस विकसित केली आहे. लसीला भारत सरकारची मंजुरी मिळाल्याने ती लवकरच उपलब्धही होईल. परंतु या लसीसाठी अद्याप भारत बायोकेटला सरकारकडून विचारणा झाली नाही. त्यामुळे सरकारकडून तूर्तास ही लस नागरिकांना नि:शुल्क मिळणे कठीण आहे. भारत बायोटेकचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी अद्याप कंपनीला सरकारकडून विचारणा  झाली नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

नागपुरात आयोजित ‘इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेस’च्या उद्घाटनासाठी डॉ. कृष्णा एला आले असता त्यांनी लोकसत्ताशी चर्चा केली. ते म्हणाले, नेझल लसीचा करोना लसीकरण कार्यक्रमात नुकताच समावेश झाला आहे. ही लस अद्याप बाजारात नाही. परंतु खासगी केंद्रातून ती लवकरच नागरिकांना उपलब्ध केली जाईल. त्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागेल. 

याआधी कोव्हॅक्सिनच्या आवश्यक चाचण्या झाल्यावरही सुरुवातीला काही जणांकडून बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु त्यानंतर या लसीचे फायदे पुढे आल्यावर विश्वासार्हता व मागणीही वाढल्याचे डॉ. एला म्हणाले. दरम्यान, या लसीसाठी सरकारकडून भारत बायोटेककडे मागणी वा विचारणा झाली का, असे विचारले असता डॉ. एला म्हणाले, अद्याप विचारणा झालेली नाही. परंतु सध्या करोना कमी असल्याने लसीबाबतचा कंपनीवरील दबाव खूप कमी झाल्याचे सांगत या विषयावर त्यांनी अधिक बोलणे टाळले.

नेझल लस कशी काम करते?

करोना विषाणू हा अनेक सूक्ष्मजंतू म्युकोसा (श्लेष्मा- नाक, तोंड, फुप्फुसे आणि पचनमार्गावरील ओलसर, चिकट पदार्थ) द्वारे शरीरात प्रवेश करतो. नाकाद्वारे दिली जाणारी लस थेट म्युकोसामध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करते. येथूनच विषाणू शरीरात शिरतो. नेझल लस शरीरात इम्युनोग्लोब्युलिन तयार करण्यास प्रवृत्त करते. हे संसर्गास रोखण्यासोबतच संक्रमणास प्रतिबंध करण्यास मदत करते.

नागपुरात जीन थेरपीला संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फार्मा क्षेत्रात जीन थेरपीला चांगले भविष्य आहे. या क्षेत्रात बरेच संशोधनही सुरू आहे. नागपूरने या थेरपीबाबत पुढाकार घेतल्यास त्यात बरेच काम होऊ शकते. नागपुरात आवश्यक सुविधा व सोयी उपलब्ध करून या उद्योगाला चालना मिळाल्यास नागपूर या थेरपीचे नेतृत्व करू शकतो, असेही डॉ. कृष्णा एला यांनी सांगितले.