चेन्नईतील स्पध्रेत झेंडा रोवला, उपविजेते पदासह दोन पुरस्कार

शालेयपासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्व भ्रमणध्वनीत अडकून पडले असल्याची ओरड होत असते. मात्र, उपराजधानीतील तारुण्याच्या उंबरठय़ावरील चार विद्यार्थ्यांनी एरोमॉडेलिंगमध्ये अभिमानास्पद कामगिरी करीत उपविजेतेपदासह दोन पुरस्कार पटकावले. चेन्नईत आयोजित एरोमॉडेलिंग स्पध्रेत या विद्यार्थ्यांनी संत्रानगरीचा झेंडा फडकावला आहे.

नागपूर हे ‘काबरे हब’ म्हणून परिचित होत असताना गेल्या काही वर्षांत ‘एरो हब’ म्हणूनही नवी ओळख बनू पाहात आहे. देशपातळीवर आयोजित विविध स्पर्धामध्ये नागपूरच्या एरोव्हिजनने अवघ्या महाराष्ट्राचे नेतृत्व करत पारितोषिके प्राप्त केली आहेत. या क्रमात एरो टू एस्ट्रो आणि इन्स्टिटय़ुू ऑफ इनोव्हेशन कौन्सिलतर्फे तामिळनाडूतील  चेन्नईच्या हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड सायन्स येथे नुकतेच ‘मायव्ही-२के१९’ स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अमेरिकेतील सिनर्जी मून येथील मुख्य तंत्रज्ञान अधिकारी वाल्स मॅरिनेरीस, मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार व्यंकटेशन उपस्थित होते. या स्पध्रेत संपूर्ण भारतातून ४२ चमू सहभागी झाल्या होत्या. त्यात नागपूर येथील टीम एरोव्हिजनचा चमू प्रमुख निशाद गेडाम (इयत्ता दहावी), वेदांत बचलकर (इयत्ता आठवी), प्रज्वल कडू (बीएस्सी प्रथम वर्ष) आणि साहील चिवंडे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. स्पध्रेत चमकदार कामगिरीचे दर्शन घडवत या विद्यार्थ्यांनी उपविजेतेपदासोबतच ‘आवडती चमू’ असे दोन पुरस्कार प्राप्त केले. स्पध्रेत तीन फेऱ्या घेण्यात आल्या.

पहिली फेरी सादरीकरणाची होती. ज्यात विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आणि एअरक्राफ्टची प्रतिकृती सादर केली. दुसरी फेरी ही बांधणीची होती. त्यात विद्यार्थ्यांना आठ तासात त्यांचे एअरक्राफ्ट तयार करायचे होते, तर तिसऱ्या फेरीत ते उडवायचे होते. एरोव्हिजनच्या विद्यार्थ्यांनी सलग चार वर्षांपासून जिंकण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या स्पध्रेतील विद्यार्थ्यांची ही पहिलीच वेळ होती. कोणतीही भीती न ठेवता त्यांनी ज्या पद्धतीने सहभाग दशर्वला तो आश्चर्यकारक आहे. त्यामुळेच ‘आवडती चमू’ हा पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला. या विद्यार्थ्यांना एरोव्हिजनच्या राजेश जोशी यांच्यासह गौरव जोशी यांनी मार्गदर्शन केले.

अमेरिकेतील चमूही प्रभावित

नागपूरच्या एरोव्हिजनच्या चमूनेच अवघ्या काही ग्रॅम वजनाचे विमान तयार केले होते. मानकापूर क्रीडा संकुलात उडवण्यात आलेल्या या विमानाला नागपूरकरांनी प्रचंड दाद दिली होती. स्पध्रेदरम्यान चेन्नई येथेही निशांत गेडामने या विमानाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तेव्हा अमेरिकेतील चमू आश्चर्यचकित झाली. त्यांनी निशांतच्या या संपूर्ण कलेचे चित्रीकरण करून त्याचे कौतुकही केले.