लोकसत्ता टीम

वर्धा : लहानपणापासून जोपासलेला छंद पुढे विक्रमाकडे नेणारा ठरू शकतो. म्हणून असे म्हणतात की, मुलांच्या आवडीनुसार त्यास घडू दिले पाहिजे. त्यातून जगावेगळा आविष्कार घडू शकतो. येथील चार्वी सचिन गरपाळ या पाचव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीच्या कामाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ‘पर्यावरण श्लोक माला’ या विषयावर चार्वीने संस्कृत भाषेत ५२ श्लोक व त्याचा हिंदी मध्ये अनुवाद करून ‘यू ट्यूब चॅनल’वर टाकले आहेत. बोधिसत्व खंडेराव, यवतमाळ यांच्या ‘पर्यावरण श्लोक माला’ या नावाचे पहिले पुस्तक २६ जानेवारी रोजी प्रकाशित होत आहे. त्यामध्ये चार्वीं चे सर्व श्लोक समाविष्ट करण्यात आले आहे.

या पुस्तकात पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन यावरील ५२ संस्कृत श्लोक, हिंदी अर्थासह समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘जल-जमीन आणि वायू प्रदूषण’ यावरील सोपे उपाय असणारे; तसेच मनुष्य जीवनातील पंचमहाभूतांचे महत्त्व विशद करणारे, अशा एकूण  ५२ श्लोकांचे  संकलन केले आहे. ‘पर्यावरण श्लोक माला’ या पुस्तकात पर्यावरण संरक्षणाचे अगदी सोपे आणि बिनखर्ची उपाय सांगितले आहेत. हे पुस्तक सर्व विद्यार्थी आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. सुप्रसिद्ध विज्ञान लेखक आणि विश्वशास्त्र अभ्यासक सुकल्प कारंजेकर यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे.

आणखी वाचा-Video : शंकरपटात बैलगाडी ‘आऊट ऑफ कंट्रोल,’ समोर उभ्या असलेल्या आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

या पुस्तकातील सर्व श्लोकांचे चार्वी गरपाळ हिने ५२ व्हिडिओ तयार केले आणि  बोधिसत्व खंडेराव ‘यू ट्यूब चँनल’ वर अपलोड केले. पाच महिन्याच्या आत ५२ व्हिडिओ अपलोड करून तिने एक नवीन रेकॉर्ड स्थापित केला आहे. सर्व संस्कृत श्लोकांचे उच्चार शिकविण्यासाठी अमृता खंडेराव यांनी चार्वीला मार्गदर्शन केले आहे. कुंदा हळबे आणि डॉ. गणेश खंडेराव यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

नॅशनल जिओग्राफिक चॅनेलच्या ‘वन फॉर चेंज’ २०२३ या लोकप्रिय मालिकेत बोधिसत्वच्या पर्यावरण विषयक कामावरील लघुपटामध्ये चार्वी गरपाळ हिने काम केले आहे. पर्यावरणाबद्दलची रुची तिला डॉ. सचिन पावडे  यांचेकडून लाभली. ऑक्सिजन पार्क हनुमान टेकडीवर झाडे लावून त्याचे संगोपन कसे करायचे हे शिकून पर्यावरण या विषयाला ‘पर्यावरण श्लोक माला’ या शृंखलाद्वारे चार्वीने लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा-‘मुख्यमंत्री महोदय, ऑल इज वेल आहे का?’ खुले पत्र लिहून ‘कोणी’ विचारले प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार्वी गरपाळ ही नृत्य, गायन, खेळ, पाठांतर, योगाभ्यास, जिम्नॅस्टिक, नाट्यकला, तसेच ऑलिम्पिक स्पर्धा परीक्षा अशा अनेक विषयात पारंगत आहे. आजपर्यंत तिने अभ्यासाव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये प्राविण्य आणि बक्षिसे मिळविली आहेत. सध्या ती सक्षम इंग्लिश मीडियम स्कूल- वर्धा या शाळेत पाचव्या वर्गात शिकत आहे.

चार्वीच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चार्वी गरपाळ या  विद्यार्थिनीने ‘पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल’ जगातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ही बाब विदर्भवासियांसाठी कौतुकास्पद ठरली आहे, अशी प्रशस्ती चार्वीस सर्वत्र मिळत आहे. याचीच नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे घेण्यात आली आहे.