अमरावती : नवरात्रोत्सवाच्या पर्वावर भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी यंदाही अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी बुधवारी पारंपरिक पदयात्रा केली. विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो भाविकांसह राणा दाम्पत्याने अनवाणी पायी चालत ही पदयात्रा पूर्ण केली.राणा दाम्‍पत्‍य गेल्‍या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्‍सवात वेळ काढून अंबादेवी आणि एकविरादेवीचे दर्शन घेतात आणि घरापासून ते मंदिरापर्यंतचे सुमारे दोन किलोमीटरचे अंतर ते अनवाणी पायी चालतात. यंदाही ती परंपरा राणा दाम्‍पत्‍याने जपली.

राणा दाम्‍पत्‍य हे आपल्‍या वक्‍तव्‍यांमुळे अनेकवेळा चर्चेत असतात. सार्वजनिक कार्यक्रमांमध्‍ये विशेषत: उत्‍सवाच्‍या काळात त्‍यांच्‍या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा देखील नवरात्रोत्‍सवात नवनीत राणा यांनी गरबा कार्यक्रमात सहभाग घेऊन स्‍वत: नृत्‍य केले. त्‍यांच्‍या नृत्‍याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत झाला होता. दहीहंडी उत्सवाचे देखील आयोजन राणा दाम्पत्य करीत असते.भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पदयात्रेत कार्यकर्त्यांसह शेकडो भाविक सहभागी झाले होते. शंकरनगर येथील राणा यांच्या गंगा-सावित्री निवासस्थानापासून सुरू झालेली ही पदयात्रा केडिया नगर, राजापेठ, कुथे स्टॉप, राजकमल आणि गांधी चौक मार्गे अंबादेवी मंदिरापर्यंत पोहोचली. मार्गावर अनेक ठिकाणी राणा दाम्पत्यासह पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

अंबादेवी आणि एकविरा देवीच्या मंदिरात पोहोचल्यानंतर राणा दाम्पत्याने महाआरती केली. यावेळी त्यांनी केवळ आपल्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी देवीच्या चरणी साकडे घातले. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी विशेषतः आत्महत्याग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख दूर व्हावे, यासाठी प्रार्थना केली. ‘महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर यांचे कष्ट दूर करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सुख-समृद्धीचे दिवस आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिक ताकद मिळावी,’ अशी प्रार्थना राणा दांपत्याने अंबा देवी आणि एकविरा देवीच्या चरणी केली.

यावेळी कष्टकरी कामगार, आदिवासी बांधव, बेरोजगार युवक-युवती, विद्यार्थी, व्यापारी आणि गृहिणी यांच्या जीवनात आनंद यावा, यासाठीही साकडे घालण्यात आले. दरम्यान, मंदिर संस्थानच्या वतीने रवी राणा आणि नवनीत राणा यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.