नागपूर : राष्ट्रीय राजकारणात विद्यमान काळात अतिशय प्रभावशाली असलेल्या नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) राष्ट्रीय चिंतन शिबीर आयोजित करण्यात येत आहे. राज्यात भाजपच्या महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या या पक्षाच्या शिबिराकडे लक्ष लागले आहे.

हे शिबीर १९ सप्टेंबरला एम्प्रेस पॅलेस, वर्धा रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटक, मंत्री छगन भुजबळ आणि यांच्यासह देशभरातून प्रमुख नेते, सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, सेल अध्यक्ष आणि राष्ट्रीय पदाधिकारी असे सुमारे पाचशेहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहे.

​या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर विचारमंथन केले जाणार आहे. पक्षाची आजवरची आणि भविष्यातील वाटचाल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील यश यावर सखोल चर्चा होणार आहे. सकाळी १० वाजता शिबिराची सुरुवात होईल आणि सायंकाळी ५ वाजता त्याचा समारोप होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी कळवले आहे.

या चिंतन शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीचा आढावा घेण्यात येईल. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आगामी निवडणुकांमध्ये यश कसे मिळवायचे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

तसेच स्थानिक पातळीवर महायुती करण्याबाबत पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले जाईल आणि त्यावर आवश्यक उपाययोजना सुचवल्या जातील. या चिंतन शिबिराची सुरुवात नागपूरमधून होत असून, यानंतर प्रत्येक विभागात अशाच बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्र जैन, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, प्रशांत पवार, तानाजी वणवे, विशाल खांडेकर, जानबा मस्के आणि नागपूर शहर व ग्रामीणचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

शिबिरात या मुद्यांवर चिंतन

युवकांचे बदलते आकांक्षा आणि जीवनशैली, समाजातील विविध घटकांच्या अपेक्षा, तंत्रज्ञान आणि समाज यांचा परस्पर संबंध, शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, आत्मनिर्भरता, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कामगार वर्गाचे हित, पक्षाची विचारसरणी गावागावात पोहोचवण्याचे धोरण, या शिबिरात पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आजी-माजी आमदार व खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सहभागी होणार आहेत. हे शिबीर शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित प्रगत महाराष्ट्र घडवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.