नागपूर : कार्यालयात लावणी नृत्य केल्याची चित्रफिती व्हायरल झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर वृत्त झळकले आणि राष्ट्रवादीचे (अजीत पवार) नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर अडचणीत आले आहेत.  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना खुलासा करण्यास सांगितले आहे. नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे आयोजित ‘दीपावली मिलन’ कार्यक्रमात  पक्षाचे काही पदाधिकारी यांनी नृत्य व नाचगाणी सादर केले.  त्याची  माध्यमामध्ये प्रसिद्धी होऊन पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणाबाबतचा लेखी खुलासा सात दिवसांच्या करण्याची सूचना केली आहे.

दरम्यान, दीपावलीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर व ग्रामीणतर्फे   ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात शहर आणि परिसरातील विविध धर्म, पंथ आणि सामाजिक स्तरावर समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘सामाजिक योद्ध्यांचा’ विशेष सन्मान करण्यात आला.पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी नव्हे, तर समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या, निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. विविध धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जातीय सलोखा आणि ‘सर्वधर्म समभाव’ या मूल्यांचा दृढ संदेश दिला.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या सुमारे १० सन्माननीय व्यक्तिमत्त्वांचा यावेळी शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  यामध्ये ख्रिस्ती धर्माचे पास्टर, त्यांच्या क्षेत्रात गरजू रुग्णांना मदत करणारे श्री विठ्ठलराव गायकवाड तसेच बौद्ध धर्मातील लेखक, महिलांसाठी आणि बचत गट यासाठी बेबी ताई रामटेके, मिनिंद मानकर, सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मराठी लावणी सादर करते शिल्पा शाही यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सन्मानित झालेल्या व्यक्तींमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती, बौद्ध अशा सर्वधर्मीय सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.  यावेळी मान्यवरांनी बोलताना सांगितले की समाजातील अंधकार दूर करून, मानवतेची ज्योत पेटवणाऱ्या या सर्व सामाजिक योद्ध्यांचा सन्मान करणे, हे आमच्या पक्षाचे कर्तव्य आहे. नागपूर शहरात सामाजिक एकोपा अधिक मजबूत व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच प्रयत्नशील राहील.

यावेळी शहराध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे , कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर  महिला शहराध्यक्षा  सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, तानाजी वनवे उपस्थित होते.