रेल्वे मार्गाच्या परिवर्तनासाठी दोन ‘नॅरोगेज’ मार्ग पंधरा दिवसांआधी बंद करण्यात आले. मात्र, त्या विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांचे योग्य समायोजन न केल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तेथील कर्मचारी कामाविना असून नेमकी कोणत्या विभागात स्थानांतरण करण्यात येईल, याबाबत कर्मचारी संभ्रमात आहेत.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या ‘नॅरोगेज’ मार्गाचे ‘ब्रॉडगेज’मध्ये परिवर्तन करण्यात येत आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात नैनपूर- जबलपूर आणि नैनपूर- बालाघाट मार्ग १ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. या दोन्ही विभागात सुमारे १५० कर्मचारी आहेत. मार्ग बंद करण्याआधी मनुष्यबळाचा योग्य तो वापर करण्यासंदर्भात नियोजन करण्याची आश्यकता होती. परंतु ते नियोजन नसल्याने मार्गावरील गाडय़ा बंद झाल्या तरी कर्मचारी तेथे कार्यरत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना काम न करताच दिवसांचे वेतन द्यावे लागणार असून रेल्वेला विनाकारण आर्थिक फटका बसत आहे.
या संदर्भात दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी हफीज मोहम्मद यांनी सांगितले की, काही कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. काही कर्मचाऱ्यांकडून पर्याय व्यवस्थेबाबत अर्ज भरून घेतला जात आहे, असे सांगितले. मात्र, मार्ग बंद होण्याआधी कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी नियुक्ती करण्याच्या नियोजनाबद्दल बोलण्याचे टाळले.
नागपूर विभागातील सी अँड डब्ल्यू, डिझेल, एस अँड टी विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये कुठे नियुक्ती मिळेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विभागात १९३९ कर्मचारी आहेत. नागपूर विभागातून रायपूर विभागात कर्मचाऱ्यांना स्थानांतरित करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नागपुरातील डिझेल शेडमध्ये सुमारे ४२२ कर्मचारी आहेत. त्यापैकी ३० कर्मचारी रायपूरला पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे तर बिलासपूर मुख्यालयाला नागपुरातून १५० कर्मचारी रायपूर विभागात स्थानांतरित करावयाचे आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे नागपुरातील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विभाग बदलल्याने ज्येष्ठता कमी होते. रायपूर विभागात नागपूर विभागापेक्षा घरभाडे भत्ता कमी आहे. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांना नागपूर विभाग सोडण्याबाबत धाकधूक आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने १७ सप्टेंबरला रेल्वे मार्ग बंद करण्याची अधिसूचना काढली. नागपूर विभागातील नॅरोगेजच्या पाच मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्यात येणार आहे. या आधी हे मार्ग बंद करण्यात येणार असल्याबद्दल बरीच चर्चा झाली. मात्र मार्ग बंद झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांचे काय, हा प्रश्न सोडवण्यात आला नाही. आता ऐनवेळी कर्मचाऱ्यांकडून पर्याय भरून घेण्यात येत आहेत.
नॅरोगेज रेल्वे मार्ग बंद केल्यामुळे सुमारे २००० कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यापैकी हजार कर्मचारी आहेत तेथेच राहतील आणि उर्वरित हजार कर्मचाऱ्यांना ब्रॉडगेजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात येतील. नैनपूर, छिंदवाडा, जबलपूर येथे रेल्वे वसाहती आहेत. त्या भागातील कर्मचारी देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी राहतील. काही कर्मचाऱ्यांना ब्रॉडगेजमध्ये जिथे जिथे रिक्त जागा आहेत तेथे पाठवण्यात येतील. विद्यमान सर्व संगणकीकृत आरक्षण प्रणाली सुरू राहील. त्यामुळे वाणिज्य विभागातील कर्मचारी तेथेच राहतील. हे सर्व नियोजन १ नोव्हेंबपर्यंतचे आहे.
– अलोक कंसल, विभागीय व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे