वर्धा : भाजपची सदस्य नोंदणी व नंतर सक्रिय सदस्य नोंदणी सर्व पदाधिकाऱ्यांना घाम फोडणारी ठरली. आता ही प्रक्रिया आटोपल्याने पुढील संघटनात्मक बांधणीचे टप्पे सूरू होणार. त्यात बूथ प्रमुख व अन्य पदाधिकारी नेमणूक होणार. शेवटी मग जिल्ह्याचे अध्यक्षपद.
आतापर्यंत झालेल्या कामकाजाचा जिल्हानिहाय आढावा मुंबईत शुक्रवारी आटोपला. त्यात केंद्रीय निरीक्षक अरुण सिंग, रवींद्र चव्हाण, राकेश पांडे, माधवी नाईक यांनी आढावा घेतला. या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यास अर्धा तास देत चर्चा केली. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट माजी खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे व राजेश बकाने व अन्य जिल्हा पदाधिकारी पण सहभागी झाले होते. नागपूर वगळता अन्य जिल्ह्याच्या तुलनेत वर्धा जिल्हा भाजपची कामगिरी सरस झाल्याचे स्पष्ट झाले. आता लक्ष २२ तारखेकडे लागले आहे.
तोपर्यंत मंडळ प्रमुख निवड आटोपली. या पदासाठी ३५ ते ४५ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली होते. यात अनेक ईच्छुक कटले. तसेच जिल्हाध्यक्ष या पदासाठी ३५ ते ५५ अशी वयोमर्यादा आता घालून देण्यात आली आहे. महिन्या, दोन महिन्याचा फरक चालू शकतो.
पुढील बूथ प्रमुख व जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सूरू होणार.संजय भेंडे व मदन येरावार हे निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. बूथ प्रमुख हे पण भाजपमध्ये महत्वाची जबाबदारी असणारे पद मानल्या जाते. जिल्ह्यात एकूण १३४६ बूथ आहेत. ३० सदस्यांची बूथ समिती असते. त्यात बूथ प्रमुख, लाभार्थी प्रमुख, मान की बात प्रमुख, पन्ना प्रमुख अशी जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाते. उदारणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिन्याच्या शेवटच्या रविवारी मान की बात हा उपक्रम प्रसारित होते. तर गावात तो लोकांना ऐकविण्याची जबाबदारी मन की बात प्रमुखावार असते.
त्याशिवाय या समितीत निवडणूक आयोगाच्या रचनेप्रमाणे पक्षाचा बूथ स्तरीय निवडणूक अधिकारी पण नेमल्या जातो. २२ एप्रिलपासून जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेस आरंभ होणार आहे