लोकसत्ता टीम
बुलढाणा: शेगाव नगरीतील उच्चभ्रू वस्तीमध्ये एक दिवसाच्या स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. बाळाला निर्दयी मातेने फेकून दिले असून तिचा एक पाय क्षतीग्रस्त असल्याचे आढळून आले.
रेल्वे मार्गाला लागून असलेल्या लखपती गल्ली या उच्चभ्रू वस्तीतील रस्त्यावर या अर्भकाला निष्ठुर मातेने फेकून दिले. अनैतिक संबंधातून हा लज्जास्पद प्रकार घडला असावा. नवजात बाळाचा एक पाय कतरलेल्या स्थितीत मिळून आल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहे. सदर अर्भकाचा रात्री कुत्र्यांनी पाय खाल्ला असेल असा अंदाज आहे. आईनेच आपल्या एका दिवसाच्या पोटच्या गोळ्याला बेवारस फेकून दिल्याचा निर्दयी प्रकार घडल्याने महिलांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली.
आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर गडचिरोलीत नक्षल्यांकडून तरुणाची हत्या
रस्त्याच्या कडेला स्त्री जातीचं अर्भक पडलेले नागरिकांना दिसून आले. माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत अर्भक ताब्यात घेतले. पोलिसांनी कलम १७४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात कुणाला माहिती असल्यास त्यांनी तपास अधिकारी हवालदार वाकेकर किंवा शेगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.