लोकसत्ता टीम

नागपूर : मासिक पाळी सुरु असताना ‘सॅनिटरी पॅड’वरुन सासूशी वाद झाल्याने नवविवाहित सुनेने आईला व्हिडिओ कॉल करुन गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनी भावेशकुमार बादुले (२४) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीला अटक केली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी (२४, पारडी) आणि भावेशकुमार प्रेमचंद बादुले (३२, रा. गरोबामैदान, कापसी चौक) दोघेही अभियंता असून टाटा स्टिल कंपनीत नोकरीवर होते. नोकरीवर असताना दोघांची ओळख झाली. दोघांमध्ये काही दिवसांतच मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुलींकडील मंडळी प्रेमविवाहास मान्यता देत नव्हती. त्यामुळे अश्विनीला पेच पडला. मात्र, भावेशकुमारने तिला विश्वासात घेऊन कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्यासाठी तयार केले. जून २०२४ मध्ये दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला.

नवविवाहित सून घरी आली आणि घरात रमली. त्यांच्या प्रेमविवाहाला माहेरुनही स्वीकार करण्यात आले. मात्र, प्रेमविवाहाला विरोध केल्यामुळे भावेश हा चिडून होता. त्यामुळे तो अश्विनीला आई-वडिलासह भावाशी बोलण्यास मनाई करीत होता. लग्न झाल्यानंतर भावेशने अश्विनीला नोकरी सोडण्यास सांगितले. सुरुवातीला तिने नकार दिला, परंतु, संसार वाचविण्यासाठी तिने नोकरीचा राजिनामा दिला. दोघांचाही संसार व्यवस्थित सुरु होता.

मात्र, उच्चशिक्षित असलेल्या सुनेच्या काही सवयी सासूला खटकत होत्या. त्यामुळे सासू नेहमी सूनेवर आरडाओरड करायची. सासूशी वाद झाल्यानंतर पतीसुद्धा आईची बाजू घेऊन अश्विनीला शिवीगाळ करुन मारहाण करीत होता. गेल्या तीन महिन्यांपासून घरात वाद सुरु होता. अश्विनीने आईला सासू आणि पतीच्या वागण्याबाबत तक्रार केली. मात्र, मुलीच्या संसारात ढवळाढवळ नको म्हणून कुणालाही दोष दिला नाही.

‘सॅनिटरी पॅड’वरुन सासूशी वाद

मासिक पाळी सुरु असल्यामुळे अश्विनीने बाथरुममध्ये ‘सॅनिटरी पॅड’ ठेवले. त्यामुळे सासूने तिला रागावले. त्यामुळे तिने ते पॅड कचऱ्याच्या डब्यात टाकले. त्यामुळे सासूने सूनेशी वाद घातला. पॅड लगेच बाहेर फेकण्यास बजावले. पती भावेशने आईची बाजू घेऊन तिला मारहाण केली आणि नोकरीवर निघून गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आईला व्हिडिओ कॉल आणि आत्महत्या

अश्विनीने आईला व्हिडिओ कॉल केला. घरात वाद झाल्याचे सांगितले. ‘आई… सासू-पतीचा त्रास मला अगदी असह्य होत आहे. मला जगायची इच्छा नाही.’ असे म्हणून फोन ठेवला. सासूने दिलेल्या त्रासाबाबत काही मेसेज आईला पाठवले. काही ‘व्हाईस नोट्स’सुद्धा आईला पाठवल्या. सासू मंदिरात गेल्यानंतर अश्विनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री पती घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली.