अकोला : शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागतो. दिवसा वीज हा शेतकऱ्यांचा कळीचा मुद्दा. त्यावर तोडगा काढण्यासाठी विविध प्रयत्न देखील झाले. आता सौर ऊर्जा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आली आहे. नऊ सौर प्रकल्पातून ३१ मेगावॉट वीज निर्मिती केली जाते. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जिल्ह्यातील आठ हजार ८०० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू झाला. त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक व मानवी संकटांना सातत्याने तोंड द्यावे लागते. त्यातच सिंचन व्यवस्थेचा अभाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरतो. पारंपरिक वीज वितरण व्यवस्थेत दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा, अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात ४३ उपकेंद्रासाठी विकेंद्रित सौर प्रकल्पातून २०४ मेगावॉट वीज निर्मित केली जाणार आहे. त्यातील जिल्ह्यात काही कालावधीतच बार्शीटाकळी तालुक्यातील जलालाबाद तीन, रेडवा दोन, मूर्तिजापूर तालुक्यातील माना दोन, पातूर तालुक्यातील पांगरा तीन, चान्नी पाच, टाकळी निमकर्दा चार, माझोड चार, कवठा खुर्द तीन, वांगरगाव चार मेगावॉटचे नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे जिल्ह्यातील आठ हजार ८०० शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक नाईक यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता अजितपालसिंह दिनोरे तसेच कार्यकारी अभियंता स्थापत्य शशांक पोंक्षे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात मुख्यमंत्री सौरकृषी योजनेला गती देण्यात आली. या योजनेसाठी जिल्ह्यात एक हजार २१७ एकर शासकीय जमीन लीज वर घेण्यात आली आहे.

६४ सौर प्रकल्पातून २०४ मेगावॉट वीज निर्मिती होणार

मेघा इंजिनिअरिंग या विकासकाच्या माध्यमातून जिल्ह्यात ४३ उपकेंद्रासाठी विकेंद्रीत पद्धतीने ६४ सौर प्रकल्प उभारून २०४ मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येत आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे या प्रकल्पातून ३१ मेगावॉट वीज निर्मितीला सुरुवात झाली. उर्वरित सर्व प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या माध्यमातून दिवसा वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.