नागपूर: अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाला एक वर्ष झाला असता अध्यक्ष प्यारे खान यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदीच्छा भेट दिली. यावेळी विविध विषयावर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षावरही टीका केली. तसेच मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानांचाही समाचार घेतला. प्यारे खान म्हणाले, नितेश राणे यांना चर्चेत राहून मोठे व्हायचे आहे. त्यामुळे ते नाहक मुस्लीम समाजावर आरोप करत असतात. मात्र, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव खराब होत आहे. त्यांचे नाव खराब होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. फडणवीस यांनी राणेंना आवर घालावी, अशी मागणीही आम्ही केली असल्याचे खान यांनी सांगितले.
७० वर्षांत काँग्रेसने केवळ मुस्लीमांना मुर्ख बनवून ठेवले. केवळ मतांसाठी वापर करत समाजाचे मोठे नुकसान केले. भाजपच्या विरोधात मुस्लीमांमध्ये विष पेरले. आजही निवडणुका आल्या की, चुकीच्या चित्रफीत समाज माध्यमांवर पसरवल्या जातात. मात्र, आपल्याला प्रगती करायची असेल तर पुढे जावे लागेल. आजही आम्ही गुजरात दंगल, बाबरी मशीद, या विषयांना चिकटून बसलाे तर कधीच विकास करू शकणार नाही, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केले.
खान पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत काही वर्षापासून काम करत आहे. त्यामुळे विकासाचे एक लक्ष्य ठेऊन काम सुरू आहे. अध्यक्षपदावर रूजू होताच पहिल्यांदा अल्पसंख्यांक शाळा सुधारणेवर भर दिला. मुस्लीम समाजामध्ये असलेले कला, कौशल्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर ते देशातील मोठे उद्योगपती व सर्वाधिक करदाते बनू शकतात. मात्र, शिक्षणाच्या अभावामध्ये समाज मागे आहे. राज्यातील सर्व अल्पसंख्यांक शाळांमध्ये अनेक वर्षांपासून उर्दूमधून शिक्षण दिले जाते. उर्दू भाषेला विरोध मुळीच नाही. मात्र, त्या भाषेतून विज्ञान आणि गणिताचे शिक्षण देऊन विकास होणे शक्य नाही. अनेक मुस्लीम विद्यार्थ्यांमध्ये पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण होण्याची ताकद आहे. परंतु, मराठी भाषा येत नसल्याने ते परीक्षेत मागे पडतात. त्यामुळे सर्व शाळांमध्ये मराठी अनिर्वाय केली. तसेच इंग्रजी माध्यम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक शाळांनी ते स्वीकारले. याशिवाय बहूतांश शाळांमध्ये चांगले शिक्षक नव्हते. आपल्याच नातेवाईकांना नोकरी दिली जात होती. यावर बंधने आणून शाळा सुधारण्याला पहिले प्राधान्य दिले. शिक्षणाशिवाय मुस्लीम बांधवांचा विकास अशक्य आहे, असेही प्यारे खान म्हणाले.
आजपर्यंत अल्पसंख्यांक आयोग काय आहे? हे लोकांना माहिती नव्हते. यात विविध धर्माचे लोक येतात. सर्वांना न्याय देण्यासाठी मागील एक वर्षापासून काम सुरू आहे. मुस्लीम समाजात होणाऱ्या तलाकचे प्रमाण रोखण्यातही आम्हाला यश आले. बहूपत्नीत्व करण्याची परंपरा वाढत चालली होती. अनेक महिलांना यामुळे त्रास हाेत होता. त्यामुळे अशा अनेक प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून संसार वाचवण्यातही आयोगाला यश आल्याचे खान यांनी सांगितले. सरकारला बदनाम करून विकास होणार नाही. विकसित भारतामध्ये सर्वांना संधी असून कौशल्य विकसित करून सर्वांनी समोर जावे असे आवाहनही प्यारे खान यांनी केले.