नागपूर: ज्या लोकांनी डिझेल गाड्या घेतल्या आहेत ते जादा पैसे मोजून गाड्या घेतल्या तरी खूश आहेत. परंतु, त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते, तसेच डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्याबाबत गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या समाजमाध्यमांमध्ये ट्रोल होत आहे. त्यावर गडकरी यांनी बऱ्याचदा खुलासा केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबतची याचिका फेटाळली आहे. दरम्यान गडकरी यांनी डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्याबाबत सांगितले की, सरकार डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे. ते इथेनॉलपासूनच बनते. हे डिझेलसोबत मिसळले जाऊ शकते. किर्लोस्कर कंपनीने एक जनरेटर तयार केले आहे. हे जनरेटर आयसोब्युटेनॉलवर चालते. त्यामुळे शेतीशी संबंधित ट्रॅक्टर आणि इतर वाहनही डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळून चालू शकते. त्याबाबत नुकतीच ट्रॅक्टर कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत माझी चर्चाही झाली. त्यांनीही सकारात्मकता दर्शवल्याचे गडकरी म्हणाले.

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळणे यशस्वी झाल्यानंतर शास्त्रज्ञ डिझेलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचा प्रयोग करत होते. परंतु हा प्रयोग फसला आणि डिझेल शुद्धच राहिल्याचे गडकरी म्हणाले. परंतु, इथेनॉलपासून बनणाऱ्या आयसोब्युटेनॉलवर प्रयोग सुरु आहेत. या प्रयोगांच्या निकालावर पुढील दिशा ठरेल असे ते म्हणाले. शनिवारी (१३ सप्टेंबर) नितीन गडकरी अँग्रीकॉस वेलफेअर सोसायटीच्या नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

गडकरी स्वतःच्या मुलाच्या व्यवसायाबाबत म्हणाले…

नितीन गडकरी यांनी आपल्या मुलाच्या व्यवसांयाविषयी सविस्तर बोलताना सांगितले की ते त्याला फक्त नवे-नवे विचार देतात. त्यांनी म्हटले, “माझ्या मुलाचा आयात-निर्यात व्यवसाय आहे. त्याने अलीकडेच इराणमधून ८०० कंटेनर सफरचंद आयात केले आणि इथून १ हजार कंटेनर केळी पाठवली. माझा मुलगा गोव्याहून ३०० कंटेनर मासळी घेऊन सर्बियाला पोहोचला. त्याने ऑस्ट्रेलियात मिल्क पावडर बनवणारा कारखानाही उभारला आहे. तो अबू धाबी आणि इतर ठिकाणी १५० कंटेनर पाठवतो असेही गडकरी म्हणाले.

इथेनॉल मिश्रण हे आयातीचा पर्याय…

नितीन गडकरी म्हणाले की, त्यांना लक्ष्य करण्यासाठी पैशाने चालवलेले एक अभियान सध्या समाजमाध्यमांवर राबवले जात आहे. त्यात काहीही तथ्य नाही. सर्व काही पारदर्शक आहे. इथेनॉल मिश्रण हे आयातीचा पर्याय आहे, खर्चिकदृष्ट्या परवडणारे आहे, प्रदूषणमुक्त आहे आणि पूर्णपणे स्वदेशी आहे. इथेनॉलमुळे देशाचे तेल आयतबाबतचे मोठ्या प्रमाणात पैसेही वाचत आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.