नागपूर येथे आयोजित हिंदू रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयुर्वेद उपचारपद्धती आणि योगासनावर बोलताना अमिताभ बच्चन यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या भेटीनंतरचा एक किस्सा सांगितला.गडकरी म्हणाले, मी रोज दीड तास प्राणायाम करतो. मागच्या पन्नास वर्षांपर्यंत माझे जीवन अनियमित होते. पक्षाचे काम करताना रोज रात्री बारा, एक वाजत असे. भूक लागली की रस्त्यात कुठेही समोसा खायचा, ढाब्यावर जेवण करायचे असे आयुष्य होते. आता मी रोज व्यायाम करतो. नुकतीच अमिताभ बच्चन यांच्यासोबत भेट झाली असता त्यांनी मला पाहताक्षणीच विचारले की तुम्ही आता पूर्वीपेक्षा दहा वर्षांनी तरुण दिसत असून यासाठी काय करता?

हेही वाचा >>> निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य करा!; शरद पवारांचे आवाहन

मी त्यांना म्हटले, की तुम्हीसुद्धा चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करू शकाल असा ‘मंत्र’ माझ्याकडे आहे. त्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी विचारले असता गडकरींना त्यांना नियमित प्राणायाम करण्याचा सल्ला दिला. गडकरी म्हणाले, करोनामध्ये मला प्राणायामची सवय लागली आणि प्रकृतीमध्ये मोठा सुधार आला. भारतीय आयुर्वेद आणि योगविज्ञानामध्ये मोठी ताकद आहे.