नागपूर : महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  राजकारण हे मुळातच रेल्वे गाडीसारखे आहे. त्यात अनेक चढतात आणि उतरतात. त्यामुळे प्रभागामध्ये ज्याच्यामागे जनता आहे त्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गेल्या पाच वर्षांत जनतेने काम करण्याची संधी नगरसेवकाच्या माध्यमातून दिली हाच तुमच्यासाठी पुरस्कार असल्याचेही गडकरी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त महापालिकेतर्फे आपल्या कार्यकर्तृत्वाने देशात नागपूर शहराचा नावलौकिक वाढवणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.  गडकरी म्हणाले, राजकारण ही रेल्वेगाडी आहे. प्रत्येक स्टेशनवर अनेक जण चढतात आणि उतरतात. गाडीचा डबा कितीही मोठा असला तरी आतील लोक बाहेरच्याला येऊ देत नाही. राजकारणातही तसेच आहे. एकदा नगरसेवक निवडून आला की पुढेही मीच राहावे असे वाटत असते. पण आजची परिस्थिती अंत्यत कठीण आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. दोन सर्वेक्षण करण्यात आले असून आणखी एकदा सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे प्रभागातील जनता ज्यांच्या मागे त्यांचाच विचार केला जाईल. गेल्या काही वर्षांत महापालिका चालवणे अत्यंत कठीण आहे. पण सर्वात कठीण नगरसेवकाचे काम. आमदार, खासदार, मंत्री भेटला नाही तरी चालेल पण सर्वसामान्य माणसाला नगरसेवक हा भेटलाच पाहिजे अशा लोकांच्या अपेक्षा असतात. चांगल्या कामाचा सन्मान झाला पाहिजे. त्यामुळेच काम करणाऱ्याला प्रोत्साहन मिळते. महापालिकेनेही अनेक चांगली कामे केली आहेत. करोना काळात तर महापालिकेच्या चमूने उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. हे यश महापालिकेच्या चमूचे  आहे, असेही गडकरी म्हणाले. यावेळी सर्व विद्यमान नगरसेवकांना गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या. महापौरांनी गेल्या वर्षभराचा कामाचा आढावा घेतला. प्रास्ताविक अविनाश ठाकरे यांनी तर संचालन मनीष सोनी यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari honors of various dignitaries in nagpur municipal corporation event zws
First published on: 05-03-2022 at 02:42 IST