नागपूर – सदैव गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी मदतीचा हात देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल रविवारी (२१ सप्टेंबर) हार्ट पेशंट्सने कृतज्ञता व्यक्त केली. जनसंपर्क कार्यक्रमात या रुग्णांनी गडकरी यांची भेट घेतली आणि ‘तुमच्यामुळे जगण्याची नवी ऊर्जा मिळाली’, अशा भावना व्यक्त केल्या.

रविवारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागपूरकर नागरिकांनी गर्दी केली. यावेळी रस्ते, वाहतूक, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, शिक्षण अशा समस्यांवरील निवेदने नागरिकांनी दिली. काहींनी रोजगाराच्या संधी, तरुणांसाठी कौशल्यविकास केंद्रे आणि परिसरातील विकासकामांच्या गतीबाबत मागण्या मांडल्या.यावेळी बायपास, अँजिओप्लास्टी तसेच वॉल रिप्लेसमेंट झालेल्या रुग्णांनी गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी आजवर शेकडो हार्ट पेशंट्सना उपचारासाठी मदत केली.त्यांच्याच प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ते संतोष यादव गोरगरीब रुग्णांपर्यंत ही सेवा पोहोचवत असतात. जनसंपर्क कार्यक्रमात त्यांच्यासोबत जवळपास दहा रुग्ण गडकरींप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आले होते. यामध्ये सर्वच वयोगटातील रुग्णांचा समावेश होता.

क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी देखील गडकरी यांची भेट घेतली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धाांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे त्यांनी कौतुक केले व भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

लोकांनी दिलेल्या निवेदनांवर गडकरी यांनी चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. काही प्रकरणांमध्ये थेट फोनवरून संपर्क साधत प्रश्नांचे ‘ऑन दि स्पॉट’ निराकरण करण्यात आले. नागरी सुविधांच्या संदर्भातील मागण्या, शासकीय योजना आदी विषयांशी संबंधित निवेदने नागरिकांनी दिलीत.