नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणाचा उल्लेख केला. कन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) नागपूर कार्यालयाचे रविवारी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रामदासपेठ येथील होटल सेंटर पाईंट येथे आयोजित कार्यक्रमात गडकरी भारताच्या विकासात विदर्भाचे योगदान या विषयावर बोलत होते.
भाजप नेत्यांकडून पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या धोरणांवर सातत्याने कठोर टीका केली जाते. पंडित नेहरूंनी घेतलेले निर्णय—विशेषतः काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे, चीनच्या नेतृत्वावर दाखवलेला अंधविश्वास, आणि समाजवादी अर्थव्यवस्थेवर दिलेला भर हे सर्व देशाच्या दीर्घकालीन हिताच्या विरोधात गेले, असा भाजपचा ठाम आरोप असतो. नेहरूंनी चीनविषयी केलेल्या ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ धोरणामुळे १९६२ मध्ये भारताला लज्जास्पद पराभव पत्करावा लागला. त्याचप्रमाणे, फाळणीच्या वेळी महात्मा गांधींनी पाकिस्तानला आर्थिक मदतीची शिफारस करत उपोषणाला बसणे आणि मुस्लिम समाजासाठी खास आग्रह धरणे, ही भूमिका देखील भाजपकडून ‘धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंवर अन्याय’ म्हणून समोर मांडली जाते.
भाजपच्या मते, या दोघा नेत्यांच्या विचारसरणीमुळे भारताने आपली धार्मिक, आर्थिक आणि सामरिक शक्ती गमावली. गांधीजींच्या सातत्याने मुस्लिम सौहार्दासाठी घेतलेल्या भूमिका आणि नेहरूंच्या धोरणांमुळे देश एकात्मतेपेक्षा तडजोडीच्या मार्गावर गेला. आज जेव्हा ‘नवभारत’ उभारण्याचा नारा दिला जातो, तेव्हा याच जुन्या चुका दाखवून भाजप आपले राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
काय म्हणाले गडकरी?
नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरी यांनी गांधी व नेहरू यांचा उल्लेख केला. गडकरी म्हणाले, ‘कृषी व उद्योग क्षेत्रात विकास झाल्यावरच विदर्भ सुखी संपन्न होईल. विदर्भाच्या लोकांची आकांक्षा विकासासोबत जुडलेली आहे. गांधीजी आणि नेहरू यांच्या दोन गोष्टी खूप प्रसिद्ध आहे. नेहरू म्हणायचे, ‘आम्हाला जास्तीत जास्त उत्पादन हवे आहे’ तर गांधीजी म्हणायचे की ‘जास्तीत जास्त लोकांचा समावेश करून अधिकाधिक उत्पादन हवे’. रोजगार निर्मिती ही आमची प्राथमिकता आहे. येत्या काळात यशस्वी तंत्रज्ञान, रोजगारनिर्मिती तसेच विदर्भातून निर्यात वाढावे. विदर्भात समृद्ध झाला तर महाराष्ट्र समृद्ध होईल आणि महाराष्ट्र समृद्ध झाला तर भारत समृद्ध होईल आणि आत्मनिर्भर भारताचा, ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा पंतप्रधानांचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल.