नागपूर : विविध बँकांचे कर्ज बुडवणारे सर्वाधिक ग्राहक हे श्रीमंत गटातील असतात, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील वनामती संस्थेत आयोजित रोजगार मेळाव्यात गडकरी बोलत होते. याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते शासकीय नोकरीप्राप्त ५ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
गडकरी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्थानापन्न झाल्यापासून मुद्रा लोन, स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराच्याही अनेक संधी मिळाल्या आहे. बँकांचे निरीक्षण केल्यास गरीब ग्राहक नियमित कर्ज भरताना दिसतात. मध्यमर्वीय ग्राहक अधून-मधून हप्ता चुकवतात. तर श्रीमंत गटातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडवताना दिसतात. ई-रिक्षा घेणाऱ्यांकडून नियमित कर्जाचे हप्ते भरले जात असल्याचेही गडकरी म्हणाले. सरकारच्या प्रयत्नाने आता युवकांना कौशल्य विकासातून विविध क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहे. त्यांनी कौशल्याच्या जोरावर स्वत:चा उद्योग उभारून नोकरी मागणारे होण्याऐवजी नोकरी देणारे व्हावे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – भूकंपाच्या बातमीने दिल्लीतील नागपूरकरांचे आप्त चिंतित
दरम्यान मेळाव्यात एकूण २३९ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी ग्यानतोष रॉय, (अप्पर सचिव, वित्तीय सेवा), विजय कांबळे (महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र), वैभव काळे (विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र) उपस्थित होते.