नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बेधडक बोलण्यासह नवनवीन कल्पना पुढे आणण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मेट्रो सिटी असलेल्या दिल्लीतील प्रदुषण नियंत्रणासह नागपूरसह सर्वत्र रोजगार निर्मितीसाठीच्या नवनवीन कल्पनाही ते मांडत असतात. नागपुरातही खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून मेहंदी काढण्याच्या प्रकल्पाचीही माहिती त्यांनी शनिवारी दिली. त्यापैकी काही महिलांना आता दुबई, ऑस्ट्रेलियासह मोठ्या मेट्रो शहरांत मागणी असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

नागपुरातील हाॅटेल रेडिसन ब्लू येथे असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी)तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले, सर्वच क्षेत्रातील कौशल्यपूर्ण कामगाराला सर्वत्र मागणी असते. नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून मेहंदी काढण्याचा एक उपक्रम नागपुरात राबवला गेला. यावेळी नागपुरातील १ लाख १० हजार महिलांच्या हातावर मेहंदी काढली गेली. त्यासाठी सुमारे ६५० महिलांनी काम केले. या महिलांना मेहंदी काढायची असलेल्या महिलेकडून २० रुपये तर शिल्लक ८० रुपये अनुदान खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून दिले गेले. त्यामुळे प्रत्येक महिलेला ३० ते ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले. या महिलांमध्ये सर्वाधिक संख्या अनुसूचित जाती व मुस्लिम समाजातील महिलांची होती. या महिलांचे कौशल्य बघत आता मेहंदी काढणाऱ्या महिलांपैकी दहा महिला विमानाने दुबईच्या लग्नात मेहंदी काढण्यासाठी बोलावणे आले आहे. या महिला तेथे गेल्या असून लवकरच त्या परततील. या महिलांना आता ऑस्ट्रेलिया, कोलकातासह इतरही मोठ्या शहरातून मागणी आहे. त्यामुळे लहान- सहान कौशल्य विकासातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणे शक्य असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी…

नागपूरला वैद्यकीय हब म्हटले जाते. नागपुरात राज्याच्या विविध भागासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलांगणातूनही मोठ्या संख्येने अत्यवस्थ रुग्ण उपचाराला येतात. या रुग्णांसाठी नागपुरात वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संस्था व तपासणी केंद्र येत असून त्यानिमित्त नवनवीन अद्यावत यंत्रही उपलब्ध होत आहे. हे यंत्र चालवण्यासाठी आजही गरजेच्या तुलनेत कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची कमी आहे. टाटासह इतर संस्थांनी येथे या क्षेत्रावरही लक्ष देऊन कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू केल्यास या क्षेत्रातही रोजगाराच्या मोठ्या संधी आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

मिहानमध्ये १ लाख तरुणांना रोजगार

नागपुरातील मिहान प्रकल्पाला सुरवातीला विरोध होत होता. येथे एक लाख रोजगार मिळणार असल्याचे सांगितल्यावर लोक हसत होते. परंतु माझ्याकडे नावासह यादी आहे. येथे आता आयटी आणि इतर कंपन्यांत सुमारे १ लाख तरुणांना रोजगार मिळाल्याचेही गडकरी म्हणाले.