नागपूर : समाजात निरपेक्ष भावनेने मदत करणारे लोक आहेत. पण, त्या सोबतच संवेदनशिलता जपणाऱ्यांची संख्याही अतिशय तोकडी आहे. कुणाला कुणाशी काहीही देणेघेणे नसते. पण, हे चित्र बदलून संवेदनशिलता जपता यायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘सोबती’ या मराठी पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा आणि ‘कम्पॅनिअन’ या इंग्रजीत अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट, आयटी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
यावेळी रामकृष्ण मठ, नागपूरचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंद, राज्याचे मुख्य आयुक्त राहुल पांडे उपस्थित होते. सोबती सेवा फाऊंडेशन आणि अमलताश बुक्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपल्याकडे जे आहे, ते देता यायला हवे. पैसा कमावणे गुन्हा नाही, पण डॉक्टरांमध्ये सुद्धा संवेदनशिलता निर्माण झाली पाहिजे, असे नितीन गडकरी म्हणाले.
शरीरातून अवयव निकामी होत जातो, तेव्हा त्याचे परिणाम काय होतात, हे त्या व्यक्तीलाच माहिती असते. अशा व्यक्तींबरोबर ठामपणे उभे राहणारे लोक हवेत. याच अनुभवांचे तटस्थ व व्रतस्थ वर्णन या पुस्तकातून करण्यात आले आहे. ईश्वराची प्रामाणिक प्रार्थना ही आजाराच्या काळात महत्त्वाची असल्याचे, प्रतिपादन स्वामी राघवेंद्रानंद यांनी केले. आयुष्यात संकट आले की आपण त्याला वाईट म्हणतो, पण हे संकट, आजार, त्रास आपल्यासाठी संधी आयुष्यात घेऊन येतात. त्यामुळे त्याकडे समाधानाने पाहिले पाहिजे, असे वर्षा वेलणकर म्हणाल्या.
यावेळी त्यांनी त्यांच्या कार्याचा प्रवास मांडला. सुश्रुत कुलकर्णी यांनी पुस्तकाची ओळख करून देताना पुस्तकाचे अंतरंग उलगडले. संचालन वीणा डोंगरवार यांनी केले.
दिशादर्शक पुस्तक
माणूस आजारी पडतो. पण जे जवळचे नातेवाईक रुग्णांची काळजी घेतात, त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा स्वतंत्रपणे विचार करायला हवा. त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी त्यांनी कशी घ्यावी, खर्चिक उपचार घेताना आर्थिक अडचणींना कसे सामोरे जावे, त्याचे नियोजन कसे करावे, रुग्ण व डॉक्टर यांच्यात कसे नाते निर्माण करावे, त्यासाठी काय गोष्टी लक्षात घ्याव्यात, हे अनेकांना माहितीच नसते. मराठीतील ‘सोबती’ आणि इंग्रजीत अनुवादित ‘कम्पॅनिअन’ ही दोन्ही पुस्तके अशा रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आधार ठरली आहेत.