नवनियुक्त प्रदेश प्रसार व प्रचार प्रमुख विश्वास पाठक यांची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : शहरात करोनाचा उद्रेक वाढण्याला भाजपने महापालिकेची पाच दिवस ताणलेली सभा जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  केला आहे. त्यांचा हा आरोप  अतिशय हास्यास्पद असून  सरकारचे अपयश लपवण्यासाठीच त्यांनी तो केला आहे, अशी टीका  भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश प्रसार व प्रचार प्रमुख विश्वास पाठक यांनी केली. लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते.

पाठक  म्हणाले, महापालिकेने ती सभा नियमानुसार आणि करोनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे घेतली. आयुक्त तुकाराम मुंढे यांना लक्ष्य करण्यासाठी किंवा त्यांनी शहरात सुरू केलेल्या विकास कामांना विरोध करण्यासाठी सभा नव्हतीच. काँग्रेसच्याच एका सदस्याच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा झाली. करोना काळात नागरिकांना अव्वाच्या सव्वा पाठविण्यात आलेली वीज देयके, ऊर्जा खात्यात राऊत यांना येत असलेले अपयश, राज्य सरकारची धडसोड वृत्ती आणि त्यातून आलेले नैराश्य लपविण्यासाठी भाजपवर आरोप केले जात आहेत.  वीज देयक हा विषय खरे तर महावितरण या सरकारी कंपनीचा आहे. या कंपनीची मालकी राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे राज्य सरकारने मदत करणे अपेक्षित आहे. मात्र नितीन राऊत वारंवार केंद्र सरकारने पैसा द्यावा, अशी मागणी करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारची कर्जाची मर्यादा वाढवून दिली आहे. मुंबई महापालिकेत दीड लाख कोटीच्या ठेवी असताना प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी करणे ही सरकारच्या अपयशाची लक्षणे आहेत, असेही पाठक म्हणाले.

केंद्र सरकारकडून महावितरणला ९ हजार कोटी

केंद्र सरकारने ९० हजार कोटींची मदत केली आहे. त्यात ९ हजार कोटी महावितरणला मिळणार आहेत. त्यातले  अडीच हजार कोटी मिळाले आहेत. उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसेल  आणि सर्वच गोष्टी केंद्र सरकारकडे मागत असतील तर तुमची आवश्यकता काय, असा प्रश्नही पाठक यांनी उपस्थित केला.

शासनातील गोंधळामुळे पुन्हा टाळेबंदीचा इशारा

टाळेबंदीवरुन केंद्र सरकारवर आरोप करणे, त्यानंतर टाळेबंदीचे अधिकार आम्हाला द्यावे,  यासाठी केंद्राकडे तगादा लावणे, पुनश्च हरिओमचा शंख फुंकणे आणि त्यानंतर पुन्हा टाळेबंदीचा इशारा देणे हे गोंधळलेल्या सरकारची लक्षणे आहेत. याच गोंधळलेल्या सरकारमध्ये नितीन राऊत हे मंत्री आहेत. त्यामुळे तेसुद्धा गोंधळलेले आहेत आणि म्हणूनच अशी विधाने करीत आहेत.

शरद पवारांचे पडद्यामागून राजकारण

ग्रामीण भागातील विकास निधी परत मागवला जात आहे. या सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी पडद्यामागून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारण करीत आहेत. जिथे भाजपची सत्ता आहे अशा नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद व महापालिकेला निधी न देणे व आलेला निधी परत बोलावणे हे केवळ राजकीय हेतूने केलेले कट कारस्थान आहे, असा आरोपही पाठक यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin raut accuses bjp of hiding government failures vishwas pathak zws
First published on: 15-07-2020 at 00:47 IST