२५ किलोमीटपर्यंत क्षेत्र विकासाची जबाबदारी

नागपूर :  भविष्यातील गरज लक्षात घेऊन नागपूर महानगराचा विकास करण्याकरिता स्थापन नागपूर महानगर विकास प्राधिकरण आपला यंदा सहावा अर्थसंकल्प मांडणार आहे. परंतु, गेल्या पाच वर्षांत एनएमआरडीएच्या विकास कामांचा आढावा घेतल्यास रस्ते, जलवाहिन्या, पावसाळी नाल्या बांधण्यात आणि विकास आराखडय़ातील कामांना अजूनही हवी तशी गती मिळाली नसल्याचे दिसून येते. शहरापासून २५ किलोमीटपर्यंत क्षेत्राचा विकास करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) स्थापना २०१७ रोजी राज्य शासनातर्फे करण्यात आली. या क्षेत्राचे नगरनियोजन, रस्ते, अभिन्यास विकसित करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, परवडणाऱ्या घरांची

निर्मिती, तीर्थस्थळांचा विकास  एनएमआरडीएची जबाबदारी आहे. पाच वर्षांत कार्यक्षेत्रातील ७१९ गावातील विकासाचा आढावा घेतला असता पूर्वी राज्य सरकारच्या निधीतून जी कामे  एनआयटी, सा.बां. विभाग करीत होती तीच कामे एनएमआरडीए करीत असल्याचे निदर्शनास येते. काही भागात कच्चे रस्ते, सिमेंट रस्ते, जलवाहिन्या, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची थोडीफार कामे झाली आहेत. परंतु कामांची आकडेवारी पाहिली तर एनएमआरडीकडे असलेल्या कार्यक्षेत्राच्या तुलनेत हाती घेतलेली कामे अत्यल्प प्रमाणात आहेत.

पश्चिम विभागात झालेली कामे

पश्चिम विभागात ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १३२४.१५ लाख रुपये खर्चाचे १४ कच्चे रस्ते (लांबी १९२७५ मीटर), ६५८.२८ लाख रुपये खर्चाचे ८ सिमेंट रस्ते ८ (लांबी १४७० मीटर) , १६०७.९६ लाख रुपयांच्या जलवाहिन्या (लांबी ११८२४.५० मीटर) यासह एकूण  ४१८८.३९ लाख रुपयांची कामे झाली.

पश्चिम विभागात एकमेव जलवाहिनी

पश्चिम विभागात १६०७.९६ लाख रुपये खर्च करून ११८२४.५० मीटरची एक जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीचे काम २०१९-२० मध्ये सुरू झाले. त्यावर्षी ९५५.३६ लाख रुपये, त्यानंतर २०२०-२१ मध्ये १७४०.०० लाख रुपये आणि २१-२२ मध्ये ४१४.२६ लाख रुपये खर्च करण्यात आले.

पाच वर्षांत ८२२७६९.६० मीटर रस्ते

उत्तर विभागात पाच वर्षांत  ३९२.६४ लाख रुपये खर्च करून ८२६४.६० मीटरचे रस्ते बांधण्यात आले. दक्षिण विभागात १७७३.४९ लाख रुपये खर्च करून १९१५४.५० मीटरचे, पूर्व विभागात २१२६.४२ लाख रुपयांचे ३६०७५.५० मीटर,  तर पश्चिम विभागात १३२४.१५ लाख रुपयांचे १९२७५.०० मीटरचे रस्ते बांधण्यात आले. एकूण ५६१६.७० लाख रुपयांचे ८२२७६९.६० मीटर रस्ते बांधण्यात आले.

उत्तर विभागात सिमेंट रस्त्यांची सुरुवातही नाही

उत्तर विभागात एकही सिमेंटचा रस्ता करण्यात आलेला नाही. याउलट दक्षिण विभागात १४३.४८ लाख रुपयांचे १४७६.७५ मीटर, पूर्व विभागात ४७.५८ लाख रुपयांची ८४५  मीटर आणि पश्चिम विभागात ६५८.२८ लाख रुपयांचे १४७० मीटर रस्ते तयार करण्यात आले

प्रस्तावित कामे

अग्निशमन केंद्र, तृतीयपंथी यांच्यासाठी घरे, सर्व वयोगटातील लोकांकरिता विरंगुळा, मनोरंजनाकरिता विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट्स, ७८ प्रसाधगृहे बांधण्याचे प्रस्तावित आहे.

७१९ गाव परिसराचा विकास करायचा आहे. एनएमआरडीएच्या पाच वर्षांतील कामाची संथगती लक्षात घेता विकास आराखडय़ातील कामे पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण आहे. शिवाय एनएमआरडीने कोणाला  जोड रस्ता करून द्यावा, असा कोणता नियम नाही. त्यामुळे ते त्यांच्या मर्जीप्रमाणे रस्ते बांधकाम करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– विजयकुमार शिंदे, सनदी लेखापाल.