• मागणी करणाऱ्यांचेही घूमजाव
  • विद्यापीठाकडून जागा, आराखडा तयार

छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि महात्मा ज्योतिबा फुले या तीन महापुरुषांच्या पुतळ्य़ाच्या उभारणीची मागणी विविध संघटनांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे केली होती. मात्र, विद्यापीठाने यासाठी परवानगी दिल्यानंतर पुतळ्यासाठी या संघटनांकडून अद्याप एक छदामही मिळाले नाही. त्यामुळे पाच वर्षांपासून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला नाही, तर काही महिन्यांआधी परवानगी मिळालेल्या इतर दोन पुतळ्य़ांच्या बाबतीतही हीच व्यथा आहे.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत परिसराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात आली होती.

विद्यापीठाने त्यावर एक समिती तयार करून पुतळ्यांसंदर्भात असलेल्या केंद्र शासनाच्या नियमावलीप्रमाणे आराखडा आणि जागा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, नियमावलीनुसार ज्या संघटना वा संस्थेने मागणी केली आहे, त्यांच्याचकडून निधी घेण्यात यावा असे नमूद केले आहे. याच नियमाचा आधार घेत, विद्यापीठाने मागणी करणाऱ्या संघटनांना आवाहनकेले.

चार वर्षांपासून एकही संघटना वा राजकीय पक्षाने त्यासाठी एक रुपयाचा निधी दिलेला नाही. त्यामुळे अद्याप पुतळा बसवता आलेला नाही, तर काही महिन्यांआधी काही विद्यार्थी संघटनांनी अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसरामध्ये स्वामी विवेकानंद आणि महात्मा फुले यांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती.

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने त्यासाठी मान्यताही दिली. मात्र, निधी गोळा करण्याचे काम जैसे थे आहे. पुतळ्याचे केवळ राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या विचारांचे जतन करणे हे तेवढेच मोठे कार्य असल्याचे दिसून येते. केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर ज्योतिबा फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यांची मागणी करणाऱ्यांनीही त्यांच्या विचाराचे पाईक असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.