अकोला : राज्यात नवनवीन योजना राबवून विविध घटकांना लाभ दिल्या जातो. त्यातच आता एका नवीन योजनेची माहिती समाज माध्यमांवर चांगलीच प्रसारित होत आहे. मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना’ अशा योजनेच्या नावाने समाज माध्यमांतून काही संदेश आले आहेत. यासंदर्भात नेमका सत्य काय? याचा खुलासा आता शासनानेच केला.
राज्यात निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली. त्यानंतर इतरही घटकांसाठी योजना आखून त्याची अंमलबजावणी झाली. शासकीय योजनांचा लाभ कोट्यावधी लाभार्थ्यांना झाला. त्यानंतरही नवनवीन नावाने शासन योजना राबवत असल्याचे संदेश समास माध्यमातून प्रसारित होत असतात. या शासकीय योजना खऱ्या की बनावट याची खातारजमा करणे आवश्यक असते. अन्यथा नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागतात. अशाच प्रकारे राज्यात ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद’ नवी योजना राबविण्यात येत असल्याचे संदेश समाज माध्यमातून समोर आले आहेत. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री बाल आशिर्वाद’ नावे योजना असून, १ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षे पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांस बाल सेवा योजना अंतर्गत दरमहा चार हजार रुपये मिळणार आहेत व याचे अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत’ अशी चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे.
प्रत्यक्षात या नावाची कुठलीही योजना नाही. या नावाने कोणतीही योजना अस्तित्वातच नसून ही अफवा असल्याचे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही, याबाबत सावध असावे. महिला व बाल विकास विभागाच्या योजनांबाबत माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व चाईल्ड हेल्पलाईन १०९८ कडे संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.
शासकीय योजनांच्या नावावर फसवणुकीचे प्रकार
विविध शासकीय योजनांच्या नावावर फसवणूक करण्याचे प्रकार चांगलेच वाढले आहेत. योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेऊन नागरिकांची फसवणूक केल्या जाते. आता तर अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावावरच नागरिकांकडून पैसे लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये नागरिकांनी सजग राहण्याची गरज दिसून येते. योजनासंदर्भात शासकीय कार्यालयातील अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.