चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठातील मराठी भाषा अभ्यासक्रमावरून सुरू झालेला गोंधळ संपता संपत नाही. विद्यापीठाला मराठी भाषा अभ्यास मंडळासाठी पूर्णवेळ अध्यक्ष अद्याप मिळालेला नाही. विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार अध्यक्षपदासाठी पात्रताधारक व्यक्ती गोंडवाना विद्यापीठ परीक्षेत्रात नाही. त्यामुळेच प्रा. संजय लाटेलवार यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली.

गोंडवाना विद्यापीठांतर्गत कार्यरत महाविद्यालयांतील मराठी प्राध्यापकांमध्ये या अभ्यासक्रमाबाबत गाेंधळ निर्माण झाला आहे. तशी कबुली मराठी विषय शिकवणाऱ्या पाच ते सहा प्राध्यापकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’कडे दिली. मात्र, विद्यापीठाच्यावतीने असा कुठलाही गोंधळ नसल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांमध्ये विद्यापीठाची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा विद्यापीठाने केला.

दुसरीकडे, विद्यार्थी आणि पालकांनी या अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठच गोंधळले असल्याचे म्हटले आहे.मागील वर्षी विद्यापीठाने मराठी भाषा हा विषय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमात नमूद केला होता, त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५ ते २६ मध्ये अनेक महाविद्यालयांत मराठी भाषा अभ्यासक्रमाचे नियमित अध्यापन सुरू झाले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार अध्यापनाचे कार्य ८० टक्के पूर्ण झाले. मात्र मराठी अभ्यासक्रम मंडळाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी मागील वर्षाचा मराठी भाषेचा अभ्यासक्रम रद्द करून सत्र प्रथम ते चतुर्थपर्यंत नव्याने अभ्यासक्रम ‘अपलोड’ केला. त्यामुळे प्राध्यापक व विद्यार्थी गोंधळले आहेत. याला अनेक प्राध्यापकांनी दुजोरा दिला.

आधी अभ्यासक्रमामध्ये कोल्हटकर यांची ‘वामांगी’ ही कविता होती. नंतर ती वगळून प्रत्यक्ष गोंडवनभाषा वैभव भाग-दोन या पुस्तकात पद्मारेखा धनकर यांची कविता समाविष्ट करण्यात आली, अशी माहिती मराठीच्या एका प्राध्यापकाने दिली.अभ्यासक्रम निर्मितीची प्रक्रिया सत्राच्या सुरुवातीला सुरू झाली होती. अभ्यासक्रमाच्या निर्मिती आणि सुधारणेविषयी मराठी प्राध्यापक व संबंधितांना कळवण्यात आले होते. नवीन अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर अभ्यासक्रम निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठी विषयाच्या सर्व प्राध्यापकांपर्यंत अभ्यासक्रम मंडळाच्यावतीने पोहोचवला होता.

मराठी विषयाच्या सर्व प्राध्यापकांनी यावर्षी तयार केलेला अभ्यासक्रमच शिकवलेला आहे. त्यामुळे ८० टक्के जुना अभ्यासक्रम शिकवला गेला, असे म्हणणे चुकीचे आहे, असा दावा विद्यापीठाने केला.मराठी भाषा अभ्यासक्रमाविषयी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांनी याविषयी आक्षेप असेल तर विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात नोंदवावा, अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठ काहीही ऐकून घेण्यास तयार नसते, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.