अमरावती : यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनेच राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरित नोंदणी (रजिस्ट्रेशन) करायची आहे. नोंदणी न झालेल्या संस्था प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतील, अशी माहिती अकरावी प्रवेश प्रक्रिया समन्वयक अरविंद मंगळे यांनी दिली आहे.

आता इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन फॉर्म क्रमांक १ भरावे लागणार असून शाखा व प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदवण्याकरीता १९ मे ते २८ मे २०२५ पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म क्रमांक १ आण २ भरावेत, अशी माहिती अरविंद मंगळे यांनी दिली आहे.

केंद्रीय प्रवेश पद्धत ही गेल्यावर्षीपर्यंत केवळ जिल्हा मुख्यालयी महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित होती. त्यामुळे अमरावती व बडनेरा शहरातील केवळ ६३ महाविद्यालयांत हे प्रवेश त्याद्वारे व्हायचे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात ऑफलाइन अर्ज भरून प्रवेश घ्यावा लागत होता. परंतु यंदा जिल्हाभरातील ३२१ हून अधिक महाविद्यालयांसाठी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश पद्धत लागू केली आहे. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, एसीव्हीसी, व्होकेशनल अशा सर्व शाखांची ३२९ हून अधिक महाविद्यालये आहेत. यापैकी ज्या शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, अशा १० महाविद्यालयांची निवड करून तसे पर्याय एकाच अर्जात दर्शवता येतील.

या प्रवेश प्रक्रियेसाठी ९ मेपासूनच महाविद्यालयांचे एकत्रीकरण सुरू झाले. १५ मे पर्यंत सर्व महाविद्यालयांची ऑनलाइन यादी तयार होईल. त्यानंतर १९ मेपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. त्यासाठी वेगवेगळे टप्पे पाडले आहेत. जिल्हाभरात ही पद्धत प्रथमच लागू होत असल्याने यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत मदत केली जाणार आहे. नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर इतर टप्पे विद्यार्थ्यांना स्वतःहून पुढे न्यायचे आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान एक मदत केंद्र उघडले जाणार आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय निवडण्याची मुभा देण्यात आली असून, चार फेऱ्यांद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या चार फेऱ्यांनंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) नावाची विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून, उर्वरित रिक्त जागांवर त्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे.