scorecardresearch

नागपूर: आता रक्त नमुन्याविना ३० सेकंदात हृदयरोगाचे निदान; युरोपीयन हेल्थ जनरलमध्ये संशोधन प्रसिद्ध

मध्य भारतातील पाच केंद्रात ‘डिजिटल’ पद्धतीने हृदयरोगाचे निदान करण्याबाबत २३८ रुग्णांवर मानवी चाचणी करण्यात आली.

Cardiologist Dr Shantanu Sengupta
नागपुरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता

मध्य भारतातील पाच केंद्रात ‘डिजिटल’ पद्धतीने हृदयरोगाचे निदान करण्याबाबत २३८ रुग्णांवर मानवी चाचणी करण्यात आली. ती यशस्वी ठरल्याने भविष्यात ‘डिजिटल’ घडयाळ मनगटावर बांधून ३० सेकंदात हृदयरोगाचे निदान करणे शक्य झाले आहे. हे संशोधन युरोपीयन हेल्थ जनरलमध्ये ६ मार्च २०२३ रोजी प्रसिद्धही झाले आहे.

हेही वाचा >>>नागपूर: डॉ. आंबेडकर भवन पाडल्याचा मुद्दा विधानसभेत

नागपुरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांच्या पुढाकाराने ही चाचणी करण्यात आली. छातीत वेदना होण्याला संबंधिताच्या शरीरात आम्लता (ॲसिडीटी) वाढणे, स्नायूदुखी, हृदयविकाराचा झटका हे कारण असू शकते. सध्याच्या प्रचलित पद्धतीत अशा रुग्णाचा प्रथम ‘ईसीजी’ काढला जातो. त्यात काही अनुचित आढळल्यास रक्त नमुने घेऊन त्यातील ‘ट्राॅपोनिन’चे प्रमाण तपासले जाते. रक्तात ‘ट्रापोनिन’चे प्रमाण जास्त आल्यास रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट होते.

हा रक्त तपासणी अहवाल यायला १ ते २ तास लागतात. डॉ. सेनगुप्ता यांनी हा विलंब कमी करण्यासाठी अमेरिकेतील ‘आरसीई टेक्नोलाॅजिस’ या कंपनीशी संपर्क साधला. यावेळी डिजिटल पद्धतीने रक्तातील ‘ट्राॅपोनिन’ शोधण्याचे तंत्र शोधण्यासाठी सोबत काम करण्यावर एकमत झाले. मध्य भारतात मानवी चाचणी घेण्याचे ठरले. त्यानुसार एका मनगटावर घडीसदृश्य बांधले जाणारे यंत्र विकसित करण्यात आले. हे यंत्र मनगटावर ३० सेकंद बांधल्यास त्यातील लेझरच्या मदतीने रक्तातील ‘ट्राॅपोनिन’ शोधणे शक्य होते.

हेही वाचा >>>नागपूर: स्वाईन फ्लूच्या जनुकीय बदलातून बदलातूनच ‘एच-३ एन २’; पद्मश्री डॉ. गुलेरिया यांची माहिती

२०२१ ते २०२३ दरम्यान डॉ. सेनगुप्ता, डॉ. महेश फुलवानी, डॉ. अजीज खान, डॉ. नितीन देशपांडे आणि रायपूरचे डॉ. स्मित श्रीवास्तव यांच्या पाच वेगवेगळ्या रुग्णालयात २३८ रुग्णांवर चाचणी झाली. रुग्णांच्या रक्तातील ‘ट्राॅपोनिन’ तपासले गेले. दोन्ही अहवालांची तुलना केली असता ९८ टक्के अहवाल सारखे व अचूक आल्याचे डॉ. सेनगुप्ता यांनी सांगितले.

डॉ. सेनगुप्ता यांनी ६ मार्च २०२३ रोजी अमेरिकेतील अमेरिकन काॅलेज ऑफ कार्डिओलाॅजीमध्ये या संशोधनाचे सादरीकरण केले. त्यानंतर हे संशोधन युरोपीयन हेल्थ जनरलमध्ये प्रसिद्ध झाले. ३० सेकंदात निदान करणारे हे जगातील पहिले तंत्र असल्याचे डॉ. सेनगुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नागपूर: प्रेम, ताटातूट, समोर मृत्यू अन् मुलीच्या भेटीची ओढ! भरोसा सेलने घडवले कुटुंबाचे मनोमिलन

कसे होते निदान?
नवीन विकसित यंत्र मानवाच्या मनगटावर घडयाळासारखे बांधले जाते. ते सुरू करताच त्यातील लेझर रक्तातील ‘ट्राॅपोनिन’चे प्रमाण शोधतो. त्यानंतर हा ‘डाटा’ थेट ‘क्लाऊड’मध्ये जातो. दरम्यान, रुग्णाच्या रक्तात ‘ट्रापोनिन’चे प्रमाण वाढल्याचे पुढे आल्यावर त्याला हृदयविकार आल्याचे स्पष्ट होऊन डॉक्टर उपचार सुरू करू शकतात.

रक्ताचे नमुने न घेता काही सेकंदात रक्तातील ‘ट्राॅपोनिन’ शोधण्याच्या तंत्राची यशस्वी चाचणी झाली. यासाठी आवश्यक यांत्रिक घडयाळ लवकरच बाजारात येऊ शकते. त्यामुळे भविष्यात इतरही चाचण्या ‘डिजिटल’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ. शंतनू सेनगुप्ता, संचालक, सेनगुप्ता हाॅस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर, नागपूर.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 11:07 IST