रिक्त पदांमुळे परिचारिकांकडे जबाबदारी
‘मेडिकल’मध्ये ‘ड्रेसर’ची पदे रिक्त असून गेल्या वीस वर्षांचा अनुभव असलेल्या परिचारिकांकडे ही जबाबदारी प्रशासनाने दिल्याचे पुढे आले आहे. ‘ड्रेसर’हून परिचारिकांना जास्त वेतन असल्याने कमी वेतनाच्या जागेवर प्रशासनाकडून जास्त खर्च केल्याचे पुढे आले आहे. सोबत मेडिकलमध्ये अंतर्गत बदल्यांना कमी काम असलेल्या वार्डातील बहुतांश परिचारिकांची ना असून त्या बदलीनंतरही हा वार्ड सोडत नाहीत, तेव्हा प्रशासनाच्या विरोधात जास्त काम असलेल्या वार्डातील परिचारिकांमध्ये रोष आहे.
मेडिकलमध्ये पन्नास वार्ड, अपघात विभाग, बाह्य़रुग्ण विभाग, अतिदक्षता, शिशु काळजी केंद्रासह अनेक विभाग आहेत. एक हजारावर परिचारिका येथे सेवा देतात. सर्वाधिक काम अपघात, बाह्य़रुग्ण, अस्थिव्यंग, शस्त्रक्रिया विभाग, कर्करोग विभागात आहे. येथे कामास अनेक परिचारिकांची ना असते. परंतु ज्या परिचारिकांना लाईट वार्डात काम मिळाले आहे, त्यांच्या प्रशासनाकडून अंतर्गत बदल्या केल्यावर तेथे जाण्यास या परिचारिका तयार होत नाहीत. लाईट वार्डात कामाचा ताण कमी असतो. ज्या परिचारिका आजारी आहेत, अशा परिचारिकांना कामाची संधी देण्यासाठी लाइट वार्ड असतात. परंतु अलीकडे लाइट वार्डात सेवा मिळवण्यासाठी परिचारिकांकडून चिरीमिरी घेतली जात असल्याचीही चर्चा परिचारिकांमध्ये आहे.
यासंदर्भात नाव न सांगण्याच्या अटीवर काही अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. नियमाप्रमाणे दर महिना, दोन महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर विविध वार्डातून परिचारिकांची बदली होणे आवश्यक आहे. परंतु अंतर्गत बदली झाल्यानंतर परिचारिका वॉर्ड सोडण्यास तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकारामुळे जास्त काम असलेल्या वार्डातील परिचारिकांमध्ये रोष असून तो केव्हाही उफाळून येण्याची शक्यता आहे. तेव्हा मेडिकल प्रशासन या प्रकरणात काय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच मेडिकलमध्ये कमी वेतनाच्या ड्रेसरच्या पदावर जास्त वेतनातील परिचारिका सेवा देत असल्याने शासनाचा मोठय़ा प्रमाणावर वेतनावरील निधी वाया जात आहे. सोबत परिचारिका येथे लावण्यात आल्याने वार्डात सेवा देण्याकरिता त्या कमी पडतात. तेव्हा येथील ड्रेसरची पदे शासन केव्हा भरणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.