नागपूर: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा आणण्याचे जाहीर केल्याने सरकार कोंडीत सापडले आहे. त्यातच या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही कंबर कसली आहे. महासंघाकडून मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर नागपुरात २८ ऑगस्टला महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची चिंता आणखी वाढली आहे. नागपुरातील बैठकीत काय होणार ? याबाबत आपण जाणून घेऊ या.
मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची राज्यभरात मोठी दखल घेतली गेली आहे. परंतु मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षणाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे. त्यामुळे ओबीसी महासंघाने या मागणीविरोधात थेट प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. ओबीसींचे आरक्षण धोक्यात येणार नाही याची हमी सरकारने द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे. दरम्यान नागपुरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांच्या निवासस्थानी २८ ऑगस्टला बैठक आयोजित केली गेली आहे. बैठकीला महासंघाचे पदाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या भागातील नेतेही सहभागी होतील.
बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल. त्यानंतर महासंघाकडून पुढील आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. राजूरकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असल्यास ते त्यांच्या स्वतंत्र श्रेणीत दिले जावे. ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देणे कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. दरम्यान जरांगेंना परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची, तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांना मुंबईऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते, हे विशेष.
शासनाने ओबीसी महासंघाला दिलेल्या लेखी हमीचे काय?
शासनाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे झालेल्या आंदोलनात मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देणार नसल्याची हमी दिली होती. त्यानंतरही आता मनोज जरांगे- पाटील आंदोलन करत आहे. त्यामुळे शासनाने आपल्या भूमिकेवर कायम रहावे, म्हणून हे आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी सांगितले.