नागपूर : वर्धा मार्गावरील अजनी चौक ते विमानतळ चौकापर्यंत असलेल्या डबल डेकर उड्डाणपुलावर भारतरत्न म्हणून सन्मानित व्यक्तींचे छायाचित्रे आणि त्यांचा संक्षिप्त परिचय असलेले फलक लावण्यात आले आहे. परंतु, यातून ओबीसी समाजाचा ‘मसिहा’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचे छायाचित्र नसल्याने ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, ज्या स्वयंसेवी संस्थेने हे फलक लावले. त्यांनी येत्या काही दिवसात भारतरत्न कर्पुरी ठाकूर बसवण्यात येईल, असे स्पष्ट केले.

आशिया खंडातील सर्वांत लांब असलेल्या डबल डेकर उड्डाणपुलावर ग्रीन फाऊंडेशन नागपूर या संस्थेने आजवर ज्यांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. त्यांचे छायाचित्र लावले आहेत. हे उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे असून त्यांचे बांधकाम महामेट्रोने केले आहे. या संस्थेने महामेट्रोच्या परवानगीने हे फलक आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना भारतरत्नांची ओळख होत आहे. नवीन पिढीसाठी ते अतिशय माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असेच आहे. मात्र, यात केवळ भारतत्न कर्पुरी ठाकूर यांचे छायाचित्र नसल्याचे आढळून आले आहे. त्यावर ओबीसी अधिकार युवा मंचचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी आक्षेप नोंदवला. झालेली चूक ग्रीन फाऊंडेशनच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर या संस्थेने फलक लावण्याचे आश्वासन दिले आहे. काही दिवसात ते फलक लावण्यात येईल, असे संस्थेचे निशांत गांधी यांनी सांगितले.

जननायक म्हणून ओळख

बिहारमधील कर्पुरी ठाकूर हे समाजवादी चळवळीतील मोठे नेते होऊन गेले. कर्पुरी ठाकूर यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदही भूषविले होते. डिसेंबर १९७० ते जून १९७१ या काळात त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविले होते. आणीबाणीनंतर आलेल्या जनता लाटेत कर्पुरी ठाकूर हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. १९७७ मध्ये मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर ठाकूर यांनी मुंगेरीलाल आयोगाच्या शिफारसीनुसार दुर्बल घटकांचा अतिमागास घटकांमध्ये समावेश करून या वर्गाला सरकारी नोकऱ्यांमध्ये २६ टक्के आरक्षण लागू केले होते. यातून जनता पक्षातच ठाकूर यांच्या विरोधात अंसतोष निर्माण झाला. शेवटी ठाकूर यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार व्ही. पी. सिंह सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गाला २७ टक्के आरक्षण लागू केले होते. तत्पूर्वी कर्पुरी ठाकूर यांनी हा प्रयोग बिहारमध्ये केला होता. कर्पुरी ठाकूर यांची राहणी अत्यंत साधी होती.