वर्धा : प्रथेचा पगडा गावगाड्यात कायम आहे. जातीय किनारही अद्याप जाणवतच असते.मंगळ ग्रहावर जाण्याची, महासत्ता होण्याची, विश्व नेतृत्व करण्याची भाषा आपल्याला नेहमी ऐकायला मिळते. मात्र, असे असताना देशाच्या सरन्यायाधीशांवर बूट भिरकावून देणारेही आहेतच. देशाच्या राजधानीत ही परिस्थिती असेल तर गावात काय असणार याची कल्पनाच केलेली बरी. दरम्यान, ग्रामविकास खात्याचा नवा निर्णय ही मानसिकता दूर करण्याचा प्रयत्न करणारा दिसत आहे.
११ डिसेंबर २०२० रोजी सामाजिक न्याय विभागाने पत्रक काढले होते. पुढे २०२१ मध्ये त्या अनुषंगाने शासकीय परिपत्रक निघाले. आता ठोस आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहे. ग्रामीण भागातील रस्ते व गावांची नावे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्रसारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाही, असे हे ९ ऑक्टोबरचे पत्रक सांगते. आता शहरी भागात पण नावे बदलणार आहे. शहरी भागात नगर विकास तर ग्रामीण भागात ग्राम विकास खाते नवी नावे रस्ते, गाव व वस्त्यांना देणार आहे.
गावाचे नाव बदलण्याची बाब सामान्य प्रशासन खात्याच्या अंतर्गत येते. म्हणून राज्यातील भागातील रस्ते व वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची बाब २०२१ च्या आदेशाने निश्चित झाली होती. जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्याचे विचाराधीन होते.आता हा नवा निर्णय झाला आहे. त्यात म्हटले आहे की जातीवाचक नावे भूषणावह नाही. म्हणून राज्यात जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यासाठी जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देणे उचित राहील.
त्यासाठी अपेक्षित कार्यवाही आता निश्चित करण्यात आली आहे. जातीवाचक नाव बदलायचे असल्यास संबंधित ग्रामसभेने तसा ठराव पास करावा. तसा प्रस्ताव गट विकास अधिकाऱ्याकडे सादर करावा. या अधिकाऱ्याने हा प्रस्ताव तपासून तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवावा. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने तो तपासून जिल्हाधिकारी यांना सादर केला पाहिजे. जिल्हाधिकारी यांनी त्यास मंजुरी द्यावी. असा नवा बदल कार्यपद्धतीत करण्यात आला आहे. जातीवाचक नावे बदलण्याची प्रक्रिया आता अशी टप्प्याटप्प्याने होणार आहे.
असंख्य गावात आजही जातीनुसार वस्त्या ओळखल्या जातात. त्या विशिष्ट भागात कोण जात समूह राहतो, याची खूणगाठ ठरली होती. त्यानुसार व्यवहार करण्याची प्रथा चालत आली. ती आजही कायम असण्याची बाब गावातील जातीयता दाखवून देणारी ठरते. विशिष्ट समूहातील व्यक्ती मोठा झाला तरी त्यास त्याच्या पिढीजात घरावरून ओळखल्या जात असते. हे हेरून जातीवाचक नावे बदलण्याची भूमिका पुढे आली. हा निर्णय तत्परतेने अंमलात आला पाहिजे, अशी प्रतिक्रिया एका सामाजिक पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.