नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महिन्याच्या आत सुधारणा करावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे बजावल्यानतरही कामात सुधारणा न झाल्याने ओसीडब्ल्यूशी झालेला करार रद्द करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांना दिला.

नागपुरातील विविध प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी हैद्राबाद हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींनी ओसीडब्लूकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासंबंधी अनेक तक्रारी केल्या. यावरून संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी ओसीडब्लूचा करार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील माहितीला महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनीही दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी कंपनीला करार रद्द करण्याची नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात येईल. त्याचबरोबर कंपनीला त्यांच्या सेवेत सुधारणा करण्याची शेवटची संधी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाणीपुरवठ्याच्या सेवेत महिनाभरात सुधारणा करावी, असे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २० मे रोजी दिले होते. त्यानंतरही कंपनीच्या सेवेत सुधारणा झाली नाही. गडकरी यांनी याबद्दल बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी ओसीडब्ल कंपनीविरोधात कारवाई करावी, अशी सूचना केल्याची माहिती बैठकीतील सूत्रांनी दिली. शहराला दररोज ७५० एमएलडी पाणी मिळत असूनही कंपनीकडून योग्य प्रमाणात त्याचे वितरण करण्यात येत नसल्याबद्दल गडकरी यांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली आहे.

शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी सुमारे दशकभरापूर्वी ओसीडब्लूला देण्यात आली होती. यानुसार कंपनीकडून शहराला २४ तास पाणीपुरवठा देणे अपेक्षित होते. मात्र, इतक्या वर्षानंतरही कंपनीकडून याची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यातच पाण्यापासून मिळणारा महसूल वाढवता आलेला नाही. तसेच गळतीचे प्रमाणही ४० टक्क्यांहून अधिक आहे.

दरम्यान, शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये ओसीडब्ल्यूने एक महिन्याच्या आत सुधारणा करावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल, या शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ऑरेंज सिटी वर्कस (ओसीडब्ल्यू)च्या अधिकाऱ्यांना बजावले. त्याचवेळी नागपूर महापालिकेच्या कार्यपद्धतीवरही गडकरी यांनी १९ मे रोजी नाराजी व्यक्त केली.

महापालिकेच्या सभागृहात गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणीपुरवठा व नागनदी प्रकल्पासह विविध कामांचा आढावा घेतला होता. नागपूर शहरात मुबलक पाणी येत असतानाही नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. त्यासंदर्भात दोन आठवड्यांपूर्वी गडकरी यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत मंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या. त्याचा आढावा आज, सोमवार रोजी घेण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर शहरात कोणत्या भागात पाणी टंचाई आहे, सर्वाधिक टँकर कोणत्या भागात वापरले जातात, कोणत्या भागात मोठ्या प्रमामात गळती आहे, अनधिकृत जोडण्या किती प्रमाणात आहेत, याचे सर्वेक्षण करावे. नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे अहवाल सादर करावा. त्यात सुधारणा करून नागरिकांना नियमीत पाणीपुरवठा होईल, याची व्यवस्था करावी. एक महिन्याच्या आत यावर अंमलबजावणी झाली नाही, तर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे गडकरी यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.