नागपूर : देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकाला खाण्यापिण्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य दिले असून मांसाहारी असल्याच्या कारणावरून विकासक किंवा इतर कोणालाही सदनिका नाकारता येणार नाहीत. मुंबई व महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसाचाच असून त्याचा सन्मान कायम राखला जाईल आणि त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. कल्याण येथे मराठी माणसाला मारहाण व अपमान करणाऱ्या अखिलेश शुक्ला या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या (एमटीडीसी) अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्या व पत्नीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.

कल्याणमधील मराठी कुटुंबीय मारहाण प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी विधानसभेतही उमटले. त्यावरून शुक्लावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कल्याण येथील योगीधाम परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या शुक्ला याने देशमुख व कळवीकट्टे कुटुंबीयांना आपल्या साथीदारांकडून मारहाण केली. त्याचबरोबर ‘तुम्ही मराठी माणसे मांसाहार करून घाण करता, अनेक मराठी माणसे माझ्याकडे झाडू मारायला आहेत, अशा स्वरुपाची वक्तव्ये शुक्ला यांनी केल्याची मराठी कुटुंबाची तक्रार आहे. याबाबत आमदार अनिल परब, सचिन अहीर, भाई जगताप, शशिकांत शिंदे आदींनी विधानपरिषदेत विविध मुद्दे उपस्थित केले.

हेही वाचा >>>वाल्मिक कराड अधिवेशन काळात नागपुरातच, विरोधी पक्ष नेत्याच्या दाव्याने खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक जैन विकासक मराठी माणसाला किंवा मांसाहार करणाऱ्यांना त्यांच्या प्रकल्पांमध्ये सदनिका देत नाहीत, अनेक सोसायट्यांमध्येही मांसाहार करणाऱ्यांना सदनिका मिळत नाही, आदी मुद्दे परब व अहीर यांनी मांडले. या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी या घटनेचा सर्व तपशील सांगितला. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी शुक्ला व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केल्याचे फडणवीस म्हणाले.