नागपूर: परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवरून सध्या राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी पेपरफूट होत असून वाढीव परीक्षा शुल्काचे पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरले. याच दरम्यान विधानसभेत रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव शुल्काचे समर्थन केले.परीक्षेचे गांभीर्य कायम राहावे म्हणून अधिक शुल्क असल्याचा दाखला दिला. मात्र आता भाजप नेते व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची २०२१ ची विरोधी पक्षात असतानाची या मुद्यावरील भाषणाचीचित्रफीत व्हायरल झाली असून त्यात ते शुल्कवाढीचा विरोध करत आहेत. यामुळे वाढीव परीक्षा शुल्काचे समर्थन करणाऱ्या फडणवीस यांची फजिती झाली आहे.

या चित्रफितीत मुनगंटीवार यांनी सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षां शुल्काच्या रकमेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. परीक्षेसाठी गरीब विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात आहे. खुल्या प्रवर्गासाठी ६०० रुपये आणि एससी-एसटी-ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ४०० रुपय शुल्क आकारले जात आहे. कुणा मंत्र्याचा मुलगा जाणार आहे का एसटी किंवा आरोग्य विभागात नोकरीसाठी? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला होता. दरम्यान, यावेळी त्यांनी सभागृहातील आमदारांना उद्देशून आव्हान दिले की, “आहे का इथे एक माई का लाल, जो म्हणेल की माझा मुलगा क्लास थ्री ची नोकरी करेल? मुनगंटीवार यांचे वरील भाषण तेव्हा गाजले होते. मात्र मात्र सत्तेत येताच फडणवीस यांनी एक हजार रुपये शुल्काचे एकप्रकारे समर्थन केल्याने मुनगंटीवार यांची गोची झाली तर मुनगंटीवार यांची जुनी चित्रफीत समाजमाध्यमावर फिरत असल्याने फडणवीस यांची फजिती होते आहे.
दरम्यान स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने यावरुन सरकारला लक्ष करत फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशीच मागणी केली आहे