गडचिरोली : २७ आगस्टला गडचिरोली-छत्तीसगड सीमेलगतच्या कोपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांना एक पुरुष व तीन महिला असे एकूण चार जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले होते. मृत चारही नक्षल्यांची ओळख पटली असून यात कंपनी १० चे दोन, गट्टा व अहेरी दलमचे एक-एक सदस्यांचा समावेश आहे. मालू पदा (४१, रा. बुर्गी, छत्तीसगड), क्रांती उर्फ जमुना रैनू (३२, बोधीनटोला ), ज्योती कुंजाम ( २७, रा. बस्तर एरिया), मंगी मडकाम ( २२, रा. बस्तर एरिया ) अशी मृत नक्षल्यांची नावे आहेत. या सर्वांवर १४ लाखांचे बक्षीस होते. यातील ज्योती कुंजाम ही अहेरी दलमची शेवटची सदस्य होती. त्यामुळे गडचिरोलीत जिल्ह्यात आता केवळ २५ सक्रिय सशस्त्र नक्षल शिल्लक असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.
२५ आगस्ट रोजी भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर असलेल्या कोपर्शीच्या घनदाट जंगलात नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र आल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाली होती. यावरून अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी ६० च्या २० आणि सीआरपीएफ च्या दोन तुकड्या दोन दिवस ३० किमी पायदळ प्रवास व १० डोंगर पार करून नक्षल्यांचा मुक्काम असलेल्या जंगलात पोहोचल्या. यावेळी मुसळधार पावसात ८ तास जोरदार चकमक उडाली. दरम्यान, घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. चकमकस्थळी पोलिसांनी शोध घेतला असता ४ मृतदेह, शस्त्र व नक्षल साहित्य आढळून आले होते. २८ रोजी पोलीस मुख्यालयात त्यांची ओळख पटविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे एकाचवेळी दक्षिण गडचिरोली सक्रिय कंपनी १० च्या दोन सदस्यांना ठार करण्यात पोलिसांना पहिल्यांदाच यश आले.
या चकमकीनंतर गडचिरोली केवळ २५ नक्षलवादी शिल्लक असून अहेरी दलम जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे गट्टा आणि कंपनी क्रमांक १० हे दोनच दलम सध्या सक्रिय असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात याच परिसरात झालेल्या चकमकीत सी ६० जवान महेश नागुलवार शहीद झाले होते.
४ वर्षात ९१ नक्षलवाद्यांना कंठस्नान
गडचिरोलीत मागील पाच वर्षापासून नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. २०२१ ते २५ दरम्यान गडचिरोली पोलिसांनी तब्बल ९१ नक्षलवाद्यांना ठार केले असून १२८ जणांना अटक केली आहे. तर गिरीधर, तारक्का या मोठ्या नेत्यांसह ७५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे उत्तर गडचिरोली पूर्णपणे नक्षलमुक्त झाले असून दक्षिण गडचिरोलीतही बोटावर मोजण्याइतके नक्षल शिल्लक आहेत. लवकरच संपूर्ण गडचिरोली जिल्हा देखील नक्षलमुक्त होईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.