बुलढाणा : संपूर्ण शहराला सुन्न करणाऱ्या सनी जाधव हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी देवराज संतोष माळी यांस अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.खून करून फरार झालेल्या आरोपींना काही तासांतच शहर पोलिसांनी पकडले. एकुण चार आरोपी अटकेत असून या आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रेमप्रकरणातून सनी सुरेश जाधव या १९ वर्षीय तरूणाचा बळी गेला. एकाच मुलीवर दोघांच्या प्रेमप्रकरणातून सदर प्रकार घडल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

यासंदर्भात ठाणेदार रवि राठोड यांनीही खूनाला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचे सांगितले चिखली रोडवर ड्रिम कॉस्मेटिक दुकानाच्या बाजूला एका निर्माणाधीन ईमारतीच्या ठिकाणी सनीवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात देवराज माळीसह इतर चार ते पाच जणांनी सनीला संपविले.

सनीच्या पोटात, डाव्या बाजूला नाभी जवळ व बरगडीच्या खाली चाकूने भोसकून त्याचा खून करण्यात आला. यात देवराज संतोष माळी (वय १९, रा. भिलवाडा बुलढाणा) सह ऋषी गायकवाड याचेही नांव समोर आले आहे. पोलिसांनी एकूण चार आरोपींना खूनप्रकरणी अटक केली आहे. सनीचे मजूर वडील सुरेश भाऊराव जाधव (वय ५० रा. गौतमनगर बुलढाणा)यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०3 (१), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारही आरोपींना आज न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सनी जाधव खून प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. केवळ ४ आरोपी नाहीत तर मारहाण करणाऱ्यांमध्ये आणखीही काही नांवे असल्याचे पोलिस सुत्रांचे म्हणणे आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बुलढाणा शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक, रवि राठोड, सपोनि. भरत चापाईतकर, सपोनि. प्रताप दत्तात्रय भोस, सपोनि. जयसिंग राजपुत, डी.बी. पथक प्रमुख पोउपनि, रवि मोरे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार पोहेकॉ. संदपि कायंदे, संतोष वाघ, महीला . सुनिता खंडारे, पोकॉ. युवराज शिंदे, विनोद बोरे, मनोज सोनुने, विशाल बनकर, दिपक चव्हाण तसेच तांत्रीक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ. राजु आडवे, पोकॉ. कैलास ठोंबरे, ऋषीकेश खंडेराव व पोहेकॉ. पंजाबराव साखरे, सुनिल जाधव यांनी केली.