विद्यापीठात ‘ऑनलाइन गोंधळ’; आवाज दाबला जात असल्याचा आरोप

नागपूर : शतकोत्तर वर्षाकडे वाटचाल करीत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची ऑनलाईन बैठक तांत्रिक कारणाने तासाभरातच गुंडाळण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. यावर सदस्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विद्यापीठ करीत असल्याचा आरोपही करण्यात आला. करोना निर्बंध शिथिल झाले असतानाही कुलगुरूंनी ऑफलाईन सभेस नकार दिल्याने सदस्यांनी या निर्णयाचा निषेध केला. आता ही बैठक २७ ऑक्टोबरला होणार आहे.

आज सोमवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन विधिसभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सर्व सदस्यांना ‘लिंक’ पाठवण्यात आली होती. मात्र, बहुतांश सदस्यांना दिलेल्या ‘लिंक’वर बैठकीत सहभागी होता आले नाही. याशिवाय जे सदस्य बैठकीत सहभागी झाले, त्यांना आवाज ऐकू येत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. याबाबत कुलसचिवांनी सदस्यांनी संपर्क साधला. मात्र, त्यांनी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वारंवार अडथळे येत असल्याचे स्पष्ट केले.

हा गोंधळ सुरू असतानाच विद्यापीठाकडून बैठकीची कारवाई सुरू करण्यात आली. त्यात अभिनंदन प्रस्ताव आणि शोक प्रस्ताव पूर्ण करण्यात आले. मात्र, वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शेवटी विद्यापीठ प्रशासनाने २७ ऑक्टोबरपर्यंत बैठक स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या प्रकाराने विद्यापीठ सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. याशिवाय यंत्रणा नसताना असा अट्टाहास कशाला करण्यात येतो, असा सवालही उपस्थित केला.

विद्यापीठ गीताचा अपमान?

बैठक सुरू होण्यापूर्वी वंदे मातरम् आणि त्यानंतर विद्यापीठ गीत घेण्यात येते. मात्र, बैठकीत दोन्ही गीतांदरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ‘इंटरनेट’ बंद झाले. त्यामुळे मध्येच विद्यापीठ गीत बंद पडले. विद्यापीठाच्या तांत्रिक गोंधळामुळे  या दोन्ही गीतांचा अपमान झाला  नाही काय, असा प्रश्न एका सदस्याने उपस्थित केला आहे.

एक सभा नीट घेता येत नाही

बैठकीदरम्यान असा गोंधळ होणे ही आजच्या आधुनिक काळात विद्यापीठासाठी हास्यास्पद आहे. आज संपूर्ण जग ऑनलाईन आले असतानाही असा प्रकार घडणे चुकीचे असून याची चौकशी व्हायला हवी. विद्यापीठ एक सभा नीट घेऊ शकत नसेल तर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग कसे झाले असतील, हा मोठाच प्रश्न आहे.

– अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी, विधिसभा सदस्य