नागपूर: मेडिकल रुग्णालयातील स्वयंपाकगृहाचा डोलारा केवळ ९ कर्मचारी सांभाळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे मुख्य स्वयंपाकीसह तब्बल ४१ पदे रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवर नाश्ता, जेवण देतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होते.

मेडिकलमध्ये रोज हजार ते बाराशे रुग्ण दाखल होतात. त्यानुसार येथे रुग्णांना जेवण व नाश्ता देण्यासाठी उपलब्ध स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढणे अपेक्षित होते. परंतु ही संख्या वाढली नाही. सेवेवरील कर्मचारी निवृत्त झाल्यावर तेही पद भरले गेले नाही. त्यामुळे केवळ ९ कर्मचाऱ्यांवरच या स्वयंपाकगृहाचा डोलारा कायम आहे.

हेही वाचा… खासगीचा कल औषध क्षेत्राकडे; संरक्षण क्षेत्रातील संशोधनावर सरकारचा सर्वाधिक भर

एका व्यक्तीला दर दिवसाला किमान २ हजार ते २ हजार ४०० कॅलरीजची गरज आहे. परंतु, स्वयंपाकींची संख्या कमी झाल्याने जेवणात पोळीऐवजी पाव दिला जात असल्याचे खुद्द रुग्ण सांगतात. त्यातच काही वेळा कमी नास्टा, जेवण पोहचवण्यास उशीर होतो. मेडिकलच्या स्वयंपाकगृहात पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मुख्य स्वयंपाकी, स्वयंपाकी तसेच सहायक स्वयंपाकी अशी ५० पदे मंजूर होती. यामुळे भात, भाजी, पोळी, कधी उसळ तर कधी अंडी अशी न्याहारी मिळत असे. परंतु पुढे कर्मचारी निवृत्त होत गेले. मात्र, रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. यामुळे आता केवळ ९ स्वयंपाकी शिल्लक आहेत. या स्वयंपाकगृहावर सुपरस्पेशालिटी, क्षयरोग विभागाचे वार्ड आणि ट्रामा केअर सेंटरमधील रुग्णांनाही जेवण उपलब्ध करण्याचा भार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकारी काय म्हणतात?

या विषयावर मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, येथील स्वयंपाकगृहात पदे रिक्त असली तरी कंत्राटी कर्मचारी नियुक्त करून रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण व नाश्ता मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळेच दिवाळीत रुग्णांना पराठा, पुलाव, शिरा, पकोड्याची मेजवानी आम्ही देऊ शकलो.