नागपूर : देशातल्या दुर्गम आदिवासी भागांमध्ये आरोग्य, शिक्षणासारख्या मुलभूत गरजा उशीराने पोचल्या. मात्र बाजारीकरणामुळे तंबाखू आणि गुटखा लवकरच पोचला. त्यामुळे दुर्गम आदिवासी समुदायांमध्येही मुख कर्करोगाचा विळखा आवळला जात आहे. राना- वनांमध्ये वास्तव्य करणारे तरुणच नाही तर मुली देखील यात गुरफटत असल्याची चिंता रॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत श्वेत पत्रिकेचे राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने डॉ. आमटे बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेसी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त राहूल माकणीकर, निकेतन कदम, रश्मिता राव, डॉ. अश्विनी पाटील, महक स्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.
दुर्गम आदिवासी भागांमध्ये दळणवळणाची साधेने जरी उशिराने पोचली तरी तंबाखूचे बोट धरून गुटखा, खर्रा आणि विदेशी मद्यही पोचल्याचे नमूद करीत डॉ. आमटे म्हणाले, आदिवासी भागांमधली तरुण पिढी झपाट्याने या व्यसनांच्या विळख्यात गुरफटत आहे. त्यामुळे आदिवासी समुदायांमधील शाळकरी मुलांमध्ये देखील मुख कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळत आहेत. नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर सारख्या मोहिमा राज्यातल्या दुर्गम भागातही पोहचवणे तितकेच गरजेचे आहे, अशा शब्दांत डॉ. आमटे यांनी या मोहिमेला प्रोत्साहनाची थाप दिली.
हेमलकसा प्रकल्पातल्या प्रवासाचे अनुभव मांडताना डॉ. आमटे म्हणाले, पिकनिक म्हणून सुरू झालेल्या हेमलकसामध्ये जेव्हा पहिले पाऊल टाकले होते, तेव्हा गरिबी हाच एक रोग होता. आज मागे वळून पाहत असताना रोगांचा पॅटर्न बदलल्याचे जाणवते. लोकबिरादरी प्रकल्पात पहिल्या दिवसापासूनच पैसा नाही म्हणून कधी काम थांबले नाही. या कामातून तयार झालेले गुडविलच आज कामाला येत आहे. त्याचा आनंद चिरकाळ टिकणारा आहे. आदिवासी तरुणांमध्ये कमालीच्या सहनशक्ती क्षमता असते. जंगलाशी नाळ जुळलेल्या आदिवासी समुदायांमधली सुशिक्षित तरुण मुलांपैकी ७० ते ८० टक्के मुले नोकरीसाठी ग्रामीण दुर्गम भागाला प्राधान्य देतात. ही समाधानाची आणि सकारात्मक बाब आहे.
या निमित्त अंमली पदार्थांच्या व्यनसनांचा त्याग करून नव्या वाटेवरच्या प्रवासाला निघालेल्या व्यसनमुक्त तरुणांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी सह पोलिस आयुक्त रेड्डी यांनी प्रास्ताविकातून भूमिका मांडली.
वर्षभरात ७०० किलो अंमलीपदार्थ नष्ट
कोणतीही नशा गरीब- श्रीमंत, स्त्री- पुरुष, जात- धर्म असे भेद पाळत नाही. त्यामुळे ऑपरेशन थंडर सुरू झाल्यापासून आतापर्यंत १० कोटी रुपयांचा ७३१ किलो अंमली पदार्थ पकडून नष्ट केल्याचे सांगत पोलीस आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले आतापर्यंत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ६४५ जणांना अटक झाली आहे. तरुणांना वाम मार्गाला लावणारी पुरवठा साखळी उध्वस्त करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. पोलीस उपायुक्त महेक स्वामी यांनी आभार मानले.