वर्धा: वैद्यकीय विज्ञान प्रगतीत रोज भर टाकत असल्याच्या घडामोडी जागतिक स्तरावर दिसून येत असतात. भारत देखील त्यात मागे नसल्याचे वैद्यकीय संशोधनातून निदर्शनास येत आहे. हृदय हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव. त्याच्या आरोग्याबाबत अजूनही नित्य नवे संशोधन सुरू आहे. त्याच्या नव्या हाताळणी बाबत भारतातील पहिली कार्यशाळा मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठातील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात संपन्न झाली असून एक उपयुक्तता पुढे आली आहे.
अपघात किंवा अन्य कारणाने मेंदूमृत झालेल्या रुग्णाची हृदयगती सुरू ठेऊन नातेवाईकांच्या संमतीने अशा रुग्णाचे यकृत, मूत्रपिंडे, फुफ्फुस आदी अवयव अन्य रुग्णांवर प्रत्यारोपित करून नवजीवन दिले जाते. या कॅडेव्हरिक शस्त्रक्रियेने अधिक प्रगत टप्पा गाठला असून आता हृदय बंद झाल्यानंतरही मृतप्राय रुग्णाचे अवयव अन्य गरजूंवर प्रत्यारोपित करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते यांनी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात आयोजित कार्यशाळेत केले.सावंगी रुग्णालयाच्या हिप्पोक्रेट्स सभागृहात निरंतर वैद्यकीय शिक्षण उपक्रमांतर्गत या विषयावर भारतातील पहिली प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. संजय कोलते यांनी अवयवदात्याच्या मृत शरीरातील अवयव जतन करण्यासाठी यंत्राद्वारे अवयवांना रक्तपुरवठा करणारी नॉर्मोथर्मिक रिजनल परफ्यूजन प्रक्रिया समजावून सांगितली.
मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील इसीएमओ उपक्रमाच्या संचालक तथा इमर्जन्सी केअर फिजिशियन डॉ. जुमना हाजी यांनी मृतावस्थेतील रुग्णाच्या हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य तात्पुरते सुरू ठेवणाऱ्या इसीएमओ प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नागपूर येथील फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकोलॉजी विभाग प्रमुख डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी डीसीडीबाबत वैद्यकीय कायदेशीर नैतिक मूल्यांची मांडणी केली.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक रुग्णालय समूहाचे संचालक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी केले. सावंगी रुग्णालयात या नवीन प्रणालीच्या वापरासंदर्भात आयोजित चर्चासत्रात युरॉलॉजिस्ट डॉ. अभिजित ढाले, बधिरीकरणतज्ञ डॉ. संज्योत निनावे, डॉ. नीता वर्मा, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अक्षय कोडमलवार, परफ्युजनिस्ट मनीष खरे सहभागी झाले होते. विविध सत्रांच्या नियामक मंडळात डॉ. तुषार पाटील, डॉ. विवेक चकोले, डॉ. संजय कृपलानी, डॉ. संदीप इरटवार, डॉ. आर.के. शिंदे, डॉ. विजेंद्र किरनाके, डॉ. अजय केवलिया, डॉ. मोहित कुरुंदवाडकर, डॉ. शिल्पा बावनकुळे, डॉ. कपिल सेजपाल यांचा सहभाग होता.