नागपूर : सामाजिक न्याय विभागातून वेगळा झालेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागात पदभरती होणार आहे. मात्र या विभागात नियमित पद भरती होणे अपेक्षित असताना बाह्यस्रोत संस्थेमार्फत २४७ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी निविदा न काढता एका खासगी कंपनीला परस्पर पदभरतीचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती आहे. यावर ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतला असून पदभरतीसाठी निविदा काढून कंपनीची निवड करण्याची मागणी केली आहे.
इतर बहुजन कल्याण विभाग साडेपाच वर्षांपूर्वी स्थापन झाले. पण, या विभागाला कर्मचारी मिळाले नाहीत. पुण्यातील संचालनालय आणि प्रादेशिक कार्यालयातून मनुष्यबळाअभावी कल्याणकारी योजना लोकापर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने बाह्यस्रोतमार्फत कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला. संचालनालय आणि प्रादेशिक कार्यालयात २४७ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, यासाठी कुठलीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. इतकी पदे भरण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सचिन राजुरकर यांनी आक्षेप घेतला आहे.
ही पदे ‘एस-२’ या कंपनीमार्फत भरण्यात येणार आहेत. राज्याच्या कामगार विभागाने काही कंपन्यांचे पॅनल तयार केले आहे. त्यापैकी एका कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव अंतिम झाला आहे, अशी माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बाह्यस्रोत संस्थेमार्फत विधि अधिकारी (२), वरिष्ठ तंत्रज्ञ (१), सिस्टीम अॅनालिस्ट (१), डेटा एन्ट्री ऑपरेटर (१), संगणक सहायक (५), संगणक ऑपरेटर (१२२), चालक (४३), पहारेकरी (३६) आणि सफाई कर्मचारी (३६) असे २४७ पदे भरली जाणार आहेत. यातील संचालनालयात- दहा, प्रादेशिक स्तर कार्यालये- २१, जिल्हा स्तर कार्यालये- २१६ पदे आहेत.
राज्य सरकारने बाह्यस्रोतामार्फत पद भरण्यासाठी काही कंपन्यांचे पॅनल तयार केले आहे. त्यापैकी एका कंपनीला ओबीसी विभागातील पदे भरण्याचे काम देण्यात आले आहे.’’- अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण