नागपूर : महापालिका निवडणूकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारुपावर जवळपास ११५ हरकतींमध्ये ५९ आक्षेप हे प्रभागांच्या सीमांकनाबाबत आहेत. या आक्षेपांवर महापालिकेच्या मुख्यालयात सुनावणीला सुरवात झाली. या सुनावणीसाठी नगरविकास विभागाने प्राधिकृत अधिकारी म्हणून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे, श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली आहे. हर्डीकर यांच्यासह महापालिका आयुक्त, डॉ. अभिजीत चौधरी सुनावणीला उपस्थित आहेत. सुनावणीसाठी कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

आक्षेप कर्त्यांचे नाव घेऊन सुनावणीच्या ठिकाणी सोडण्यात येत आहे, इतर कुणालाही सुनावणीच्या स्थळी प्रवेश देण्यात येत नाही आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेवकांनी प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला आहे. महापालिकेकडून २३ ऑगस्टला प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या.४ सप्टेंबरपर्यंत यावर ११५ हरकती राजकीय पक्ष व नागरिकांकडून नोंदवण्यात आल्या. यामध्ये प्रभागांच्या सीमांकनासंबंधीचे ५९, तर प्रभागामधील वस्त्यांच्या नावांबद्दल २६, तर १६ आक्षेप मतदान केंद्र, बुथ यासंबंधीचे असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली. आक्षेप नोंदवलेल्यांना नोटीस पाठवण्यात आल्या असून त्यात दिलेल्या वेळेनुसार सुनावणी घेण्यात येणार आहे. प्रभागातील सीमांकनाच्या आक्षेपासंबंधीची सुनावणी एकाच वेळी घेण्यात येणार आहे.

या आक्षेपांवर आता सुनावणी होऊन लवकरच अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून आक्षेप नोंदवण्यात आले. बहुतांश आक्षेपांमध्ये प्रभागांचे सीमांकन, एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आलेल्या वस्त्या, मतदान बुथचे स्थानांतरण यांचा समावेश आहे. तर चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द करावी अशीही मागणी करणारे आक्षेप आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आक्षेप नोंदवले असून यात काँग्रेस, भाजप, बसप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांचा समावेश आहे. दिवसभर ही सुनावणी होणार असून त्यानंतर यासंबंधीचा अहवाल नगरविकास विभागाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यात महापालिका निवडणुका घेण्यासंबंधीचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर केले. जाहीर करण्यात आलेले प्रारूप काही किरकोळ बदल सोडल्यास २०१७ च्या प्रभाग रचनेनुसारच असल्याचे आढळून आले. नागपूर महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. ६ मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपली. त्यानंतर साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून निवडणुका न झाल्याने प्रशासकाच्या माध्यमातून महापालिकेचा कारभार सुरू आहे.