अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद येथून धमकीचे पत्र मिळाल्‍यानंतर राणा समर्थकांमध्‍ये चिंतेचे वातावरण आहे. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना तातडीने पोलीस सुरक्षा पुरविण्‍यात यावी, अशी मागणी त्‍यांचे खासगी सचिव उमेश ढोणे यांनी राणा दाम्‍पत्‍याच्‍या सुचनेवरून पोलीस आयुक्‍तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारच्‍या वतीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची (सीआयएसएफ) वाय दर्जाची सुरक्षा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. पण त्‍यांना नुकतेच ११ ऑक्‍टोबर आणि १४ ऑक्‍टोबरला जिवे मारण्‍याच्‍या धमकीचे पत्र मिळाले आहे. हे पत्र हैदराबादमधील अज्ञात व्‍यक्‍तीने पाठवले आहे. नुकत्‍याच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्‍या असून नवनीत राणा यांना गर्दीच्‍या ठिकाणी जावे लागणार आहे. गर्दीच्‍या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये आणि समाजकंटकांकडून नवनीत राणा यांना धोका निर्माण होऊ नये, म्‍हणून त्‍यांना तातडीने सुरक्षा पुरविण्‍यात यावी, असे उमेश ढोणे यांनी पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी यांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

हेही वाचा >>> Video : थरारक… ‘त्या’ दोन वाघिणींमध्ये तुंबळ लढाई, पर्यटकांच्या डोळ्यासमोर…

दुसऱ्या निवेदनात उमेश ढोणे यांनी आमदार रवी राणा यांना पोलीस सुरक्षा पुरविण्‍याची मागणी केली आहे. रवी राणा यांना राज्‍य सरकारची ‘वाय प्‍लस स्‍कॉड’ दर्जाची सुरक्षा देण्‍यात आली आहे. पण निवडणुकीच्‍या प्रचारादरम्‍यान त्‍यांना गर्दीच्‍या ठिकाणी जावे लागणार आहे. रवी राणा यांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षा पुरविणे आवश्‍यक असल्‍याचे ढोणे यांनी निवेदनात म्‍हटले आहे. 

हेही वाचा >>> मानधनात वाढ, मात्र तरीही ‘या’ लाडक्या बहिणी नाराजच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हैदराबाद येथून धमकीचे पत्र पाठविणाऱ्याने स्‍वत:चे नाव आमिर असे लिहिले आहे. त्‍याने १० कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे. पत्रात पाकिस्तान झिंदाबाद असेही लिहिले आहे. आपल्‍यावर कितीही गुन्‍हे दाखल झाले, तरी पोलीस आपले काहीच बिघडवू शकत नाही, त्‍यामुळे यातून सुटण्‍यासाठी पैसे पाठवावेच लागतील, अशा स्‍वरूपाची धमकी देण्‍यात आली आहे. नवनीत राणा यांना त्‍याच व्‍यक्‍तीने गेल्‍या शुक्रवारी अशाच स्‍वरूपाचे पत्र पाठवून नवनीत राणा आणि त्‍यांचे पती आमदार रवी राणा यांच्‍याबद्दल असभ्‍य भाषेचाही वापर केला होता. दुसऱ्या पत्राने गांभीर्य वाढले आहे. शहर पोलिसांनी धमकी देणाऱ्या संबंधित व्‍यक्‍तीच्‍या विरूद्ध कायदेशीर कारवाई करावी आणि त्‍याला तातडीने अटक करण्‍यात यावी, अशी मागणी राणा यांचे स्‍वीय सहायक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिसांकडे केली आहे.