नागपूर : तो पाह्य तिकडं… तो… तो… तिथं…पाह्य जो रे…अंगावर येईन…जरसाक तिकडं व्हय ना…डसन ना तो मले…. पाह्य रे बावा… ती बकेट घे जो इकड… झाक झाक… झाक त्याले…टाक…. टाक… टाक… बकेट टाक…..त्या अन्या ले फोन लावजो रे… बलंव त्याले…बलव ना रे बावा पटकन त्याले…
तुम्हाला प्रश्न पडला असेल, के काय नवीन. पण हा संवाद आहे पाचपावली पोलीस ठाण्यात सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या एका प्रसंगातला. गुन्हे शोध विभागाच्या कक्षात निघालेल्या एका सापाने चक्क अर्धा ते पाऊण तास डीबी पथकाला असे कापरे भरविले. पाचपावली परिसरात सध्या जुन्या पुलाचे तोडकाम आणि नवी उड्डाण पुलासाठी पिलर टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माती उपसली जात आहे. त्यात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाची रिपरीप सुरू झाली. या पावसात एक साप बिळातून बाहेर आला आणि पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या डीबी पथकाच्या कक्षात पोहोचला. हा साप जेव्हा तिथे आला तेव्हा पोलीसांचे संपूर्ण डीबी पथक कक्षात होते. परीसरात पकडलेल्या जुगारींवर कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
ही प्रक्रिया सुरू असताच एका पोलिसाची सापावर नजर पडली. पाहता क्षणी तो साप घोणस सापासाररखा दिसत होता. त्याच्या अंगावरचे चट्टे पाहून पोलीसही घाबरले. साप लांबीला फार मोठा नसला तरी धष्टपुष्ट होता. त्यामुळे तो नक्कीच अत्यंत विषारी प्रजातीतला घोणस असावा, असे पोलीसांना वाटले. डीबी पथकाने लगेच पाचपावली परिसरातला सर्पमित्र आनंदला फोन करीत पोलीस ठाण्यात बोलावले. भर पावसात हा सर्पमित्र पोलीस ठाण्यात पोचला. त्याने सापाला तेथून सुरक्षित बाहेर काढत एका थैलीत बंद केले.
साप निघाला बिनविषारी….
पोलीस ठाण्यात निघालेला हा साप डुरक्या घोणस नावाने ओळखला जातो. सरपटणाऱ्या जीवांच्या शास्त्रीय भाषेत त्याला सँड बोवा असेही म्हटले जाते. सुदैवाने विषारी प्रजातीतला नसल्याने सर्वांनी अखेर सुटकेचा निःश्वास टाकला. हा साप घोणस सारखा दिसतो. त्यामुळेच त्याला त्याला डुरक्या घोणस म्हटले जाते. निशाचर असलेला हा साप रात्रीच्यावेळी आणि साधरण पाण्याजवळ सापडतो, असेही सर्पमित्र आनंदने सांगितले. त्यामुळे डीबी कक्षात उपस्थित सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.