अकोला : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान अकोल्यातील सुमारे १६ पर्यटक पहलगामला पोहोचण्यापूर्वीच हल्ला झाल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना जाण्यापासून रोखण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले आहेत. ते सर्व सुखरूप असून श्रीनगरमध्ये परतले आहेत.
गुरुमाऊली टूर्सच्या माध्यमातून अकोल्यातील १६ पर्यटकांसह एकूण ३० जण जम्मू काश्मीरला गेले होते.मंगळवारी ते पहलगाम येथे जाणार होते. मात्र, येथे जाण्यापूर्वीच त्या ठिकाणच्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्याची माहिती अकोल्यातील पर्यटकांना मिळाली. पहलगाम येथे जाण्यापासून त्यांना वेळीच रोखण्यात आले. त्यामुळे हे सर्व पर्यटक सोनमर्ग येथून श्रीनगर येथे दाखल झाले आहेत. काही पर्यटक श्रीनगर येथील हॉटेलमध्ये थांबून आहेत. हे पर्यटक कालच्या घटनेने हादरून गेले आहेत. पर्यटक आता घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत.
नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा…
काश्मीरमधील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला असून या ठिकाणी जिल्ह्यातील पर्यटक अडकले असल्यास श्रीनगर येथील संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. 0194-2483651, 0194-2457543, 7780805144, 7780938397 यावर संपर्क साधता येईल. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. 0724-2424444 आहे. काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील कोणी नागरिक अडकले असल्यास तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
वाशीम जिल्ह्यातील ६० वर पर्यटक सुखरुप
दोन दिवसांपूर्वी वाशीम येथील मुक्तांगण योगा संस्थेच्या ६० हून अधिक महिला तसेच नागरिक काश्मीरला पर्यटनासाठी गेले आहेत. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याने त्या पर्यटकांविषयी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, वाशीम जिल्ह्यातील त्या सर्व पर्यटकांशी संपर्क झाला आहे. ते पर्यटक सुखरूप हॉटेलमध्ये असल्याची माहिती वाशीम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी दिली.