नागपूर : ‘घर से निकलते ही, फुटपाथ पर चलते ही..’ या ‘रॅप’ने सध्या समाजमाध्यमावर प्रचंड धुमाकूळ घातलाय. उपराजधानीतील पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथावर फेरीवाले आणि वाहनचालकांनी केलेल्या अतिक्रमणाची या गाण्यातून पोलखोल करण्यात आली आहे. मात्र, पदपथावरील अतिक्रमण काढण्यात हात आखडता घेणाऱ्या महापालिका प्रशासनाला जाग येईल का, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
‘मुंबई, तुला बीएमसीवर भरोसा नाही का…’ या गाण्याने काही वर्षांपूर्वी समाजमाध्यमावर गहजब केला होता. रेडिओ जॉकी मलिष्का हिने पावसाळ्यानंतर मुंबईतील रस्त्याच्या होणाऱ्या चाळणीवर केलेले हे गाणे चांगलेच गाजले होते. मात्र, त्यानंतरही मुंबई महापालिका जागी झाली नाही. याउलट तिलाच यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. आता नागपूरच्या पदपथावरील अतिक्रमणावर ‘आरजे’ पल्लवीने प्रहार केला आहे.
हेही वाचा – ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उठवत असल्याने मला लक्ष्य करण्यात आले – डॉ. आशीष देशमुख
पल्लवीचे गाणे इन्स्टाग्राम, फेसबुकवर चांगलेच गाजत असून नागपूरकरांनीही ते उचलून धरले आहे. शहरातील पदपथ म्हणजे पादचाऱ्यांसाठी नाहीच, असेच जणू चित्र आहे. हे पदपथ फेरीवाले, विक्रेत्यांनी ताब्यात घेतले आहेत. आयटी पार्कसमोरील पदपथ तर जणू खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी विकतच घेतले आहे. असेच चित्र शहरातील खामल्यासह अनेक भागांत आहे. थातूरमातूर कारवाई करून एक-दोन दिवस हे अतिक्रमण काढले जाते आणि पुन्हा ते जसेच्या तसे होते. परिणामी, वाहनांच्या धडकेत होणारे अपघातही वाढत आहेत. एका रेडिओ वाहिनीने तयार केलेल्या या गाण्यातून मांडलेले नागपुरातील फुटपाथवरील अतिक्रमणाचे वास्तव सध्या नागपूरकरांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे.