वर्धा,काही लोकं जीवनात सदैव संघर्ष करीत असतात. एक आव्हान आले की त्यावर मात करीत पुढील वाट चालण्याचा त्यांना जणू ध्यासच लागला असतो. संकटात खचून नं जाता पुढील संधी निर्माण करणारे हे असे अवलिया इतिहास घडवितात, असे म्हटल्या जाते. जीवनाच्या अखेरीपर्यंत त्यांचा श्वास समाज जीवनासाठी चालल्याचे बघायला मिळते. अश्याच पैकी एक म्हणजे मुरलीकांत पेटकर हे होत. त्यांच्या कर्तृत्वाच्या कथा मनोरम्य अशाच. चकित करणाऱ्या.
हे आदरणीय पेटकर भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत. ज्यांनी १९७२ च्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. १९६५ च्या युद्धात ते जखमी झाले होते.नंतर बराच काळ कोमात होते.कोमातून बाहेर पडून त्यांनी यश मिळवले. ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातून त्यांची संघर्षमय कहाणी सर्वांसमोर आली आणि त्यांना नुकताच जीवनगौरवसाठी अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे.
पेटकर यांनी १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदांचा विश्वविक्रम रचला आणि सुवर्णपदक जिंकले. त्यांनी भालाफेक, अचूक भालाफेक आणि स्लॅलम या स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. ज्यामध्ये ते अंतिम फेरीत पोहोचले होते. त्यांना पॅरालिम्पिकमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पद्मश्री आणि २०२४ मध्ये जीवनगौरवसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांची वाटचाल खडतर अशीच झाली.१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात जखमी झाल्यानंतर ते १८ महिने कोमात होते. यानंतर त्यांनी जिद्दीने पुनरागमन करत पॅरालिम्पिकमध्ये यश मिळवले. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. त्यातून त्यांच्या संघर्षाची गाथा लोकांपर्यंत पोहोचली. ते आता वर्धा भेटीवर येत आहे. ९ नोव्हेंबरला त्यांची भेट इको पार्क येथे होणार.
इको पार्क पिपरी मेघे येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत पेटकर हे विशेष संवाद साधणार तो मुक्या प्राण्यांशी. पीपल फॉर ऍनिमल्स या संस्थेचे करुणाश्रम हे अनाथ पशु पक्ष्यांसाठी अनाथालय आहे. संस्थेचे आशिष गोस्वामी म्हणतात की देशाचे भूषण असलेले पेटकर हे विशेष निमंत्रणातून येत आहे. येथील पशु व पक्षी यांची देखभाल, गाईचे संगोपन, वन्य जीवांची काळजी या बाबी त्यांना आपुलकीच्या वाटतात. हे महनीय व्यक्तिमत्व भेटीस येण्याची बाब आमच्या संस्थेस प्रेरणादायी ठरेल.
