नागपूर : ‘एआय’ च्या माध्यमातून तयार होणाऱ्या कलाकृतींमुळे सध्या खरे काय आणि खोटे काय, हे कळायला मार्ग नाही. खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे करण्याची किमया ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साधली जात आहे. सध्या असाच एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक दारुडा चक्क वाघाला दारु पाजताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओसोबत सर्वांना खरी वाटावी अशी कथा देखील रचण्यात आली आहे.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल ते चंद्रपूर मार्गावर एका वाघिणीने धुमाकूळ घातल्याचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये ही वाघीण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, वाघिणीचे हे व्हिडिओ खरे आहेत. कारण तिच्या एका बछड्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने बछड्याच्या शोधात ती सैरभैर झाली आहे. दरम्यान, आता नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील एका व्हिडिओने मात्र अवघ्या काही क्षणात समाजमाध्यम व्यापले आहे. हा व्हिडिओ ‘एआय जनरेटेड’ आहे हे स्पष्टपणे दिसत असूनही काही लोक मात्र डोळे झाकून हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत.

रात्री उशिरा पत्त्यांचा खेळ खेळल्यानंतर राजू पटेल हा ५२ वर्षीय कामगार रस्त्यावर आलेल्या वाघाला थोपटत असल्याचे दिसून येत आहे. गावठी दारूच्या व्यसनात अडकलेला हा कामगार रस्त्यावरच अडखळलेला आहे. त्याचवेळी त्याठिकाणी एक वाघ पेंच व्याघ्रप्रकल्पातून येतो. त्या वाघाला पाहून गावकरी घाबरतात आणि घराचे दरवाजे बंद करतात. मात्र, दारू प्यायलेला हा कामगार ‘बाजूला हो मांजरी..’ असे बडबडत हळूवारपणे त्या वाघाच्या डोक्यावरुन हात फिरवतो. पाच ते दहा मिनिटे ते एकत्रच उभे राहतात आणि मग थोड्यावेळाने तो कामगार त्याच्या हातात असलेल्या बाटलीतून वाघाला दारु पाजण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी वनखात्याचे कर्मचारी त्याठिकाणी येतात आणि वाघाला बेशुद्ध करुन घेऊन जातात. या व्हिडिओसोबत अशीच एक कथा रचण्यात आली आहे.

माणूस कितीही दारु प्यायलेला असला तरी वाघाला पाहताच त्याची पाचावर धारण बसते. प्यायलेल्या दारुची नशा उतरते. अशावेळी त्या वाघाच्या जवळ जाणे आणि त्याला हात लावणे तर दूरचीच गोष्ट आहे. हा व्हिडिओ ‘एआय जनरेटेड’ असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असूनही लोक तो समाजमाध्यमावर व्हायरल करत आहेत. वाघ हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत ‘शेड्यूल वन’ मध्ये असणारा वन्यप्राणी आहे. त्यामुळे अशा प्राण्याबाबत केलेल्या या खोडसाळपणावर वनविभाग कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.