नागपूर : राज्यातील कारागृहांमध्ये तृतीयपंथी कैद्यांसाठी स्वतंत्र बराक तयार केले जावे, यासाठी नागपूर येथील तृतीयपंथी उत्तमबाबा सेनापती याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात गृह विभागाच्या सचिवांना नोटीस बजावून यावर येत्या ११ ऑक्टोबपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

न्यायमूर्ती रोहित देव आणि अनिल पानसरे यांच्यापुढे ही सुनावणी झाली. उत्तमबाबा हा तृतीयपंथी चमचम गजभिये याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. ही घटना जून-२०१९ मध्ये नागपुरात घडली होती. उत्तमबाबाला सुरुवातीला नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये पुरुष कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, पुरुष कैदी शारीरिक-मानसिक छळ व लैंगिक अत्याचार करतात, असा खळबळजनक आरोप उत्तमबाबाने केला होता. त्यामुळे त्याला १७ जून २०२१ रोजी अकोला जिल्हा कारागृहात स्थानांतरित करण्यात आले. परंतु, तेथेही त्याला पुरुष कैद्यांसोबत ठेवण्यात आले आहे. ते कैदीसुद्धा छळतात, असे उत्तमबाबाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्वतंत्र बराकीवर निर्णय होईपर्यंत महिला कैद्यांच्या कक्षात ठेवण्यात यावे, अशी मागणीदेखील त्याने केली आहे. उत्तमबाबातर्फे अ‍ॅड. सोनिया गजभिये यांनी बाजू मांडली

...म्हणून याचिका : उत्तमबाबा यांच्या वकील अ‍ॅड. सोनिया गजभिये यांनी सांगितले की, कारागृहामध्ये तृतीयपंथीयांना पुरुष कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात येते. यामुळे पुरुष कैदी त्यांचा लैंगिक छळ करतात. तृतीयपंथी कैद्यांना महिला कैद्यांच्या बराकीमध्ये ठेवले जावे असाही नियम नाही. राज्यातील कुठल्याही कारागृहामध्ये तृतीयपंथी कैद्यांसाठी वेगळी व्यवस्था नाही. त्यामुळे या याचिकेच्या माध्यमातून तृतीयपंथी कैद्यांसाठी स्वतंत्र बराक तयार केले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.